विद्यार्थ्यांची ऑनलाईन वर्गापासून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:19+5:302021-05-04T04:06:19+5:30
अमरावती: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरात बसून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता जवळपास दोन महिने दिलासा मिळणार ...
अमरावती: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरात बसून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता जवळपास दोन महिने दिलासा मिळणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने शनिवार १ मेपासून शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या आहेत. यात विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक राहत असल्याने येथील शाळांना २८ जून पर्यंत उन्हाळी सुट्या जाहीर केल्या असून दोन महिने विद्यार्थ्यांची ऑनलाइन वर्गापासून सुटका होणार आहे.
गतवर्षी प्रमाणेच कोरोनाचा प्रादुर्भाव याहीवर्षी वाढला असल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा महाविद्यालय बंद आहेत. शाळा बंद असल्या तर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन वर्गात हजर राहावे लागत होते. शिक्षकांनाही गेले वर्षभर दररोज ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून अध्यापन करावे लागले आहे. काही शिक्षकांना मधल्या काळात शाळेतही बोलावले जात होते. अशा सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना आता जवळजवळ दीड ते दोन महिन्यांची सुटी जाहीर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. या सुट्ट्यांच्या काळात कोणत्याही प्रकारचे वर्ग घेऊ नये असे शासनाने सूचित केले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सुट्टीचा आनंद घेता येणार आ. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शाळेच्या नव्या पद्धतीपासून काही काळ विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर छंद जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्यामुळे संधी मिळणार आहे.
बॉक्स
गुरुजीचे टेन्शन कमी!
शिक्षण विभागाने जरी सुट्ट्या जाहीर केल्या असली तरी दहावीचे अंतर्गत मूल्यमापन आणि बारावीच्या परीक्षेची तयारी याच काळात करावी लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना काम करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे शिक्षकांना ही उन्हाळी सुट्टी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.