अल्प मनुष्यबळावर कसरत; प्रभारींवर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:51 PM2018-06-16T21:51:53+5:302018-06-16T21:52:09+5:30
नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना अल्प मनुष्यबळावर प्रशासन चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे मर्यादित स्रोत व आस्थापना खर्चातील भरमसाठ वाढ यामुळे नोकरभरतीवर गदा आली. परिणामी ८० टक्के विभागप्रमुख हे प्रभारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना अल्प मनुष्यबळावर प्रशासन चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे मर्यादित स्रोत व आस्थापना खर्चातील भरमसाठ वाढ यामुळे नोकरभरतीवर गदा आली. परिणामी ८० टक्के विभागप्रमुख हे प्रभारी आहेत. काही वर्षांपासून उपायुक्त ते सहायक आयुक्त, अधीक्षकांपर्यंत तात्पुरता पदभार देऊन महापालिकेचा गाडा कसाबसा ओढला जात आहे.
उपायुक्त, सहायक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, करसंकलन मूल्यनिर्धारक अधिकारी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख ही पदे रिक्त असल्याने त्यावर महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली. दीड वर्षांपासून महापालिकेचा आकृतिबंध मंत्रालयात धूळखात पडला आहे. मागे इमर्जंसी पदे ठेवून वाढीव पदांसाठी नव्याने प्रस्ताव देण्याचे नगरविकासने सांगितले होते. मात्र, वाढीव पदांचा तो प्रस्तावही अद्याप मंत्रालयात पोहोचला नाही. जुन्याच आकृतिबंधानुसार महापालिकेचा कारभार सुरू असून, वाढीव पदांसह आकृतिबंध मंजूर करून घेण्याचे आव्हान निपाणे यांच्यासमोर दत्त म्हणून उभे आहे.
हे आहेत प्रभारी
पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्याकडे उपायुक्त (प्रशासन), महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांच्याकडे उपायुक्त (सामान्य) तसेच सिस्टीम मॅनेजर डेंगरे, सांख्यिकी अधिकारी योगेश पिठे तथा वरिष्ठ लिपिक सुनील पकडे व मंगेश वाटाणे यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा प्रभार आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून वैद्यकीय अधिकारी, तर सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी पदावर डॉक्टर इन्चार्ज पदभार सांभाळत आहेत. शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ या तीनही पदांचा संयुक्त कार्यभार निवृत्त अनंत पोतदार यांच्याकडे आहे. या प्रभारी व्यक्तींवर निपाणेंना महापालिकेचा गाडा उत्तमरीत्या सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.