दोन सदस्यांचे बहिर्गमन; महिला सदस्यांची नाराजी
By admin | Published: August 18, 2015 12:25 AM2015-08-18T00:25:40+5:302015-08-18T00:25:40+5:30
कर आकारणी, खड्डे तसेच जागा हस्तांतरणाविषयी चर्चा सुरु असताना काही ठरावीक सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते, ...
कार्यक्रम पत्रिका फाडली : महापौरांवर पक्षपाताचा आरोप
अमरावती : कर आकारणी, खड्डे तसेच जागा हस्तांतरणाविषयी चर्चा सुरु असताना काही ठरावीक सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते, असा आरोप करून अंबादास जावरे, विजय नागपुरे यांनी विषयपत्रिकांच्या प्रती फाडून सभागृहातून बहिर्गमन केले, तर महिला सदस्यांनी महापौरांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला.
महापालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कर आकारणीवरून जोरदार चर्चा करण्यात आली. यात बहुतांश सदस्यांनी मते नोंदविली. विजय नागपुरे, अंबादास जावरे हे दोन सदस्य मते मांडण्यासाठी माईकपुढे येताच महापौर चरणजित कौर नंदा यांनी त्यांना बसण्याचा सल्ला दिला. तेव्हा विजय नागपुरे यांनी ‘ मला का बोलू दिले जात नाही, मी या सभागृहाचा सदस्य नाही काय?’ असे म्हणत त्यांनी कार्यक्रम पत्रिका फाडून सभागृहातून बहिर्गमन केले. नागपुरे यांच्या आरोपानुसार काही सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. महापौरांचे हे दुटप्पी धोरण संयुक्तिक नाही, असेदेखील नागपुरे, जावरे म्हणाले.
गणेशोत्सवात खड्डे बुजविण्याचा विषय चर्चिला जात असताना अर्चना इंगोले, कांचन ग्रेसपुंजे यादेखील बोलण्यास उभ्या झाल्यात. परंतु या विषयावर बरेच सदस्य बोलले असून आता खाली बसा, असे महापौर नंदा म्हणाल्या. तेव्हा अर्चना इंगोले यांनी महापौरांच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. शेगाव मार्गावर मोठा खड्डा पडला असून तो जीवन प्राधिकरणाने दुरुस्त करावा, असे अपेक्षित असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. तसेच निर्मला बोरकर, कांचन ग्रेसपुंजे यांनी महिला सदस्यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला.
येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्र्यींकरणासाठी जागा हस्तांतरण करण्याचा निर्णय द्यायचा होता, तर एवढा वेळ चर्चेत घालविला कशाला, असा सवाल कांचन ग्रेसपुंजे यांनी महापौरांना केला. निर्मला बोरकर यांनी जागा हस्तांतरणाविषयी बोलण्याची संधी सोडली नाही. हा विषय कायम आणि मंजूर झाला असतानाही त्यांनी मत नोंदविले, हे विशेष. यावेळी महिला सदस्यांनी समान बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
शासन अधिकाऱ्यांवर एफआयआर का नाही?
घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे आयुक्त गुडेवारांनी उघडकीस आणून महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, शासनाचे अधिकारीदेखील यात सहभागी असताना त्यांच्यावर फौजदारी का दाखल केली नाही, असा सवाल दिंगबर डहाके यांनी उपस्थित केला. उपायुक्त, लेखापरीक्षक आणि लेखापाल हे शासनाचे अधिकारी असून तेसुध्दा जबाबदार आहेत, असे डहाके म्हणाले. विलास इंगोले, अरुण जयस्वाल, अजय गोंडाणे यांनीदेखील मत व्यक्त केले. डहाके यांनी आयुक्त गुडेवार यांना तुम्हच्यावरही सोलापुरात अपहार झाल्याचा आरोप असून एफआयआर दाखल होणे म्हणजे गुन्हेगार होत नाही, असे ते म्हणाले.