कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ
By admin | Published: December 31, 2015 12:16 AM2015-12-31T00:16:08+5:302015-12-31T00:16:08+5:30
कृषी पंपाच्या वीज जोडणीची थकीत देयके अदा करण्यासाठी महावितरण द्वारा कृषि संजीवनी योजना सुरु करण्यात आली होती.
३१ मार्च मुदत : कृषी पंपाच्या थकीत वीज बिलावरील व्याज, दंड माफ
अमरावती : कृषी पंपाच्या वीज जोडणीची थकीत देयके अदा करण्यासाठी महावितरण द्वारा कृषि संजीवनी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महावितरणच्या कृषी ग्राहकांना मुदत करण्याच्या दृष्टीने व त्यांच्याकडील वीज देयकांच्या थकीत रकमेचा भार कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी संजीवनी योजना -२०१४ राबविण्यात आली. सुरुवातीला ही योजना ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस ३१ आॅक्टोंबर २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली. आता या योजनेला ३१ मार्च २०१६ मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात हजारों शेतकऱ्यांकडे वीज बिल थकीत असून या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेला मुदतवाढीमुळे योजनेसाठी पात्र होण्यासाठी कृषी ग्राहकांना ३१ मार्च २०१४ च्या मुळ थकबाकी रकमेच्या ५० टक्के मुळ थकीत रक्कम ३१ मार्च २०१६ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के मुळ थकीत रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान स्वरुपात माफ करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१४ नंतर वितरित करण्यात आलेल्या चालू वीज देयकांचा भरणा करणे योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्रहकांना क्रमप्राप्त आहे.
कृषी ग्राहकांना वीज बिल करण्यासंबंधी सुलभ हफ्ते आवश्यक असल्यास ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्च २०१६ अखेर सर्व रक्कम वसूल होईल अश्या रितीने समान हप्ते पाडून देण्यात येणार आहे.
सदर कृषी संजीवनी योजना २०१४ ही तात्पुरत्या व कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या कृषी ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना सुद्धा लागू राहणार आहे. त्या कृषि ग्राहकाने योजनेत सहभाग घेतला नाही. अथवा योजने अंतर्गत ठरविण्यात आलेल्या रकमेच्या भरणा केला नाही. अश्या कृषी ग्राहकांना योजनेकरीता अपात्र ठरविण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे व्याज व दंडासहित पूर्ण रक्कम पुनश्च ग्राहकांच्या खात्यात दर्शविली जाणार आहे. व विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसूलीकरिता नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खंडित झालेल्या कृषीपंपाच्या जोडण्या पूर्ववत करता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)