बडनेऱ्यात विशेष शिर्षातून विधायक कामांची अपेक्षा

By admin | Published: April 5, 2015 12:21 AM2015-04-05T00:21:22+5:302015-04-05T00:21:22+5:30

महापालिका अर्थसंकल्पात बडनेरा शहराच्या विकासासाठी नवीन शीर्ष निर्माण करण्यात आला आहे. ..

Expectation of constructive work in Badnera | बडनेऱ्यात विशेष शिर्षातून विधायक कामांची अपेक्षा

बडनेऱ्यात विशेष शिर्षातून विधायक कामांची अपेक्षा

Next

अमरावती : महापालिका अर्थसंकल्पात बडनेरा शहराच्या विकासासाठी नवीन शीर्ष निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या शिर्षातून नाली, रस्त्याचे बांधकाम करण्यापेक्षा विधायक कामे व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी वर्तविली आहे. बडनेरा शहराच्या सर्वांगीण विकासासासाठी काँग्रेसच्या सदस्य कांचन ग्रेसपुंजे काही वर्षांपासून लढा देत आहेत. परंतु भाजपचे शहराध्यक्ष तथा सदस्य तुषार भारतीय यांनी पोटतिडकीने रेटा लावून बडनेरा शहर विकासासाठी स्वतंत्र शीर्ष निर्माण करुन स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरु केली आहे.
बडनेरा शहराचा प्रश्न, विकासकामे, नागरिकांना दिली जाणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांची बाब आली की कांचन ग्रेसपुंजे, प्रकाश बनसोड, जयश्री मोरे, छाया अंबाडकर, गुंफाबाई मेश्राम, जावेद मेमन, विजय नागपुरे, चंदुमल बिल्दानी हे सदस्य प्रशासनावर तुटून पडतात. विशेषत: कांचन ग्रेसपुंजे, प्रकाश बनसोड हे बडनेऱ्याच्या विकासाकरिता अधिक निधी कसा खेचून आणता येईल, याचे नियोजन करतात. नुकतेच बडनेऱ्याच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचे नवे शीर्ष निर्माण करण्यात आले आहे. हा निधी विधायक कामांसाठी खर्च व्हावा, अशी जनतेची मागणी आहे. राजकारण बाजूला ठेवून शहराचा विकास कसा करता येईल याचा कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. अमरावतीप्रमाणे बडनेऱ्यातही सुविधा मिळाव्यात, त्यानुसार प्रशासनाच्या पुढकाराने नियोजन आखणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन शिर्षातून माझ्या प्रभागात अधिक निधी कसा मिळेल, याचे नियोजन सदस्यांनी आखले आहे. नवीन शिर्षाप्रमाणे भविष्याचा वेध घेत विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली जाणे काळाची गरज आहे. बडनेरा न.प.चे महापालिकेत विलिनीकरण झाल्यामुळेच अमरावती महापालिका उद्यास आली. अन्यथा अमरावती नगरपरिषद राहिली असती. बडनेरा शहराची लोकसंख्या बऱ्यापैकी असून मूलभूत सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहे. तोकडा निधी मिळत असल्याने नगरसेवकांना विकासकामे करताना मर्यादा येतात, हे खरे आहे. परंतु नव्याने महापालिकेत निर्माण झालेल्या बडनेरा शहर विकास शिर्षात भविष्याचा वेध घेत विधायक कामे करण्याचे ठरविले तरच निर्माण झालेले शीर्ष सार्थकी ठरेल.

सकारात्मक दृष्टिकोनातून शीर्ष निर्मितीचा पाठपुरावा
बडनेरा शहराचा विकास करण्यात आला नाही, हे वास्तव आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्र्मिक वारसा लाभलेल्या या शहराकडे विकासात्मकदृष्ट्या सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे शल्य आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय सभेत सकारात्मक पाठपुरावा करुन स्वतंत्र शीर्ष निर्मितीचा पाठपुरावा करण्यात आल्याचे नगरसेवक तुषार भारतीय म्हणाले.

विकासाबाबत बडनेऱ्याला
सापत्न वागणूक
बडनेरा शहराचे विलिनीकरण अमरावती नगरपरिषदेत झाले नसते तर महापालिका उदयास आली नसती. मात्र, बडनेरा शहराचा विकास व्हावा, यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय सभेत सर्वप्रथम मागणी रेटून धरली. बडनेरा शहराचा प्रश्न आला की सहभागी झाल्याशिवाय राहत नाही. नव्या शिर्षाने विकासकामे करणे सुलभ होईल, असे नगरसेविका कांचन ग्रेसपुंजे म्हणाल्या.

नव्या शिर्षामुळे विकासकामांचा
मार्ग सुकर
बडनेरा शहर विकासाच्या नावाने नवीन शीर्ष निर्माण करुन तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ही बाब महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असून त्याकरिता सर्वच सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विधायक कामे कशी करता येतील, हे सर्वांना विश्वासात घेऊन ठरविले जाईल, असे रिपाइंचे सदस्य प्रकाश बनसोड यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासूनच्या
मागणीला न्याय मिळाला
अमरावती शहराच्या तुलनेत बडनेरा शहराला फारसा निधी मिळत नव्हता. मात्र नवीन शीर्ष निर्माण झाल्यामुळे सदस्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला सभागृहात न्याय मिळाला. या निधीतून होणारी कामे ही येणाऱ्या पिढीला लक्षात राहील. पायाभूत सोयीसुविधा या इतर निधीतून उपलब्ध करता येईल, असे नगरसेविका जयश्री मोरे म्हणाल्या.

Web Title: Expectation of constructive work in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.