अल्पसंख्यक महिलेला न्यायाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:58 PM2018-02-03T21:58:08+5:302018-02-03T21:58:33+5:30
अल्पसंख्याक महिलेला पतीने माहेरी आणून सोडले नि परत नेण्यास नकार देत व्हिसासह सर्व कागदपत्रे सोबत घेऊन गेला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अल्पसंख्याक महिलेला पतीने माहेरी आणून सोडले नि परत नेण्यास नकार देत व्हिसासह सर्व कागदपत्रे सोबत घेऊन गेला. पोलीस थातूरमातूर कार्यवाही करीत असल्याने बजरंग दलाचे विभाग संयोजक संतोष गहरवार, सत्यजितसिंह राठोड यांनी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महिलेने पत्रपरिषदेत नमूद केल्यानुसार, नांदगावपेठ येथील एजाज उल हसन यांची कन्या आलीया हिचा विवाह चंद्रपूर येथील नासीर हुसैन युसूफ शरीफ याच्याशी १२ फेब्रुवारी २००९ रोजी झाला. लग्नानंतर हे दाम्पत्य लंडनला गेले. पती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. त्यांचा पाऊणेतीन वर्षांचा एक मुलगा आहे. एप्रिल २०१५ मध्ये त्याने आलीयाला माहेरी आणून सोडले नि लवकरच घेऊन जाणार असल्याचे सांगितले. तो आजतागायत आलाच नाही तसेच आलीया यांचे व्हिसा, पासपोर्ट व युकेचे नागरिकत्व प्राप्त असलेल्या लहान मुलाची कागदपत्रेसुद्धा नासीर हुसैन सोबत घेऊन गेला. पीडितेची शंका खरी ठरली असून, तिला पतीने वकिलामार्फत सोडचिठ्ठीची नोटीस पाठविली आहे. याप्रकरणी आलीयाने नांदगावपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नासीर हुसैनविरुद्ध भादंविच्या कलम ३९८ (अ) नुसार गुन्हा नोंदविला आहे. नासीर हुसैन याला अटक करून कठोर शासन करावे व तिला न्याय द्यावा, अशी विनंती तिने पत्रपरिषदेत केली. यावेळी बजरंग दलाचे संतोष गरहवार, सत्यजितसिंह राठोड, एजाज उल हसन उपस्थित होते.