दर्यापूर तहसीलमधील जेल कक्षात समस्यांचा खच
By admin | Published: May 7, 2016 12:43 AM2016-05-07T00:43:47+5:302016-05-07T00:43:47+5:30
तहसीलमधील जेल कक्षाचा पूर्वी कैदी ठेवण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु आता स्वतंत्र विभाग निर्माण झाल्यामुळे या जेल कक्षाचा वापर निवडणुकीचे साहित्य
प्रशासनाचे दुर्लक्ष : निवडणुकीचे साहित्य ठेवण्याकरिता होतो वापर
शुभम बायस्कार दर्यापूर
तहसीलमधील जेल कक्षाचा पूर्वी कैदी ठेवण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु आता स्वतंत्र विभाग निर्माण झाल्यामुळे या जेल कक्षाचा वापर निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली.
ज्येष्ठ कक्षात मोठ्या प्रमाणात समस्या असून याकडे तहसील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. परिसरात निवडणुकीचे साहित्य, पुस्तके, साक्षर भारतचे कॅलेंडर तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्याद्वारे देण्यात येणारे मतदान केंद्राध्यक्ष व मतदार अधिकारी याची माहिती देणाऱ्या पुस्तकांवर मोठ्या प्रमाणावर धूळ साचलेली होती व हे साहित्य अस्ताव्यस्त खाली पडलेले होते. सर्व टाकावू वस्तू जेलमध्ये कोंबून भरण्यात आलेल्या होत्या. तालुक्यातील लोकांच्या कामकाजाची माहिती ठेवणारे तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड, फाईली या साऱ्या सहित्यांवर धुळीचा थर चढला असून त्याकडे कुणी ढुंकूनही पहायला तयार नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कित्येक वर्षांपासून वापरात नसलेल्या साहित्यांचा तहसील कार्यालयामार्फत लिलाव न झाल्याने त्या या कक्षात कोंबून ठेवलेल्या आहे. त्यामुळे साहित्यावर प्रचंड प्रमाणात झाडांच्या पाला पाचोळ्याचा थर बसलेला होता. तसेच जेल कक्षात महापुरुषांचे फोटोसुद्धा फुटक्या अवस्थेत धूळ खात आहेत.
तसेच तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना आतमध्ये पार्किंगची व्यवस्था असूनसुध्दा या जेलरुमजवळ अज्ञात कर्मचाऱ्याने आपले वाहन उभे करून ठेवले आहे. परंतु त्या बाबीवर संबंधित अधिकाऱ्यांचे कक्ष नसल्यामुळे हा परिसर दुर्लक्षितच आहे, असे दिसून आले आहे.
जेलजवळ प्रसाधनगृहाचीसुध्दा पाहणी केली आहे. या प्रसाधनगृहाचीसुध्दा दैनावस्था झाल्याचे आढळून आले आहे.
ट्रेझरी कार्यालयाजवळील पोलीस चौकी बंदच
जेल कक्षाजवळून अगदी लागून ट्रेजरी कार्यालय असल्यामुळे इथे दोन स्वतंत्र २४ तास सेवेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करुन ठेवण्यात आल्यांची माहितह देण्यात आली होती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष या पोलीस रुमची पाहणी करण्यात आली तेव्हा रुम बंद आढळून आली जर सूर्याच्याच उजेडात हा प्रकार या चौकीत होत असेल तर २४ तास ही चौकी उघडी असेलच का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.