‘थिंक शाश्वत’ ग्रुपच्यावतीने प्रयोगशील विज्ञान प्रदर्शनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:15 AM2017-11-19T00:15:01+5:302017-11-19T00:15:20+5:30
‘थिंक शाश्वत’ ग्रुपच्यावतीने २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शनाचे आयोजन कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘थिंक शाश्वत’ ग्रुपच्यावतीने २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शनाचे आयोजन कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये करण्यात आले आहे. ‘यस, यू कॅन डू इट’ ही त्याची थीम आहे. यामध्ये शास्त्रज्ञांशी चर्चा करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळेल, अशी माहिती बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड व शाश्वत शाळेचे संचालक अतुल गायगोले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
विज्ञान शिक्षणात प्रयोेगांचे महत्त्व वादातीत आहे. तथापि, पाठ्यपुस्तकातील वा प्रयोगवहीतील वर्णनांचे रूक्ष, यांत्रिक त्यांचे सादरीकरण असे त्याचे स्वरूप असते. यामध्ये प्रायोगिक कौशल्य विकास, जिज्ञासा जागृती, स्वयंविचार आणि निर्ष्कष काढण्याची क्षमता यांसारखी कौशल्ये दुर्लक्षित राहतात. त्यामुळे सहज उपलब्ध साहित्यातून विज्ञान अभ्यासक्रमातील संकल्पनांशी निगडित अशा अनेक अनुभवांचा खजिना विद्यार्थी व शिक्षकांसाठी पर्वणी ठरू शकतो. देशात विविध ठिकाणी सादर करण्यात आलेल्या अशा अनुभवांची शिदोरी अमरावती परिसरातील विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी थिंक शाश्वत व टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात नवे दालन उघडणारा आहे. आंतराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक आनंद घैसास व अनुराग शेवाळे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे अतुल गायगोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी अनेक मनोरंजक प्रयोग या चार दिवसीय विज्ञान प्रदर्शनीत सादर करतील. विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांसाठी ते नि:शुल्क खुले राहणार आहे. यापूर्वी २१ नोव्हेंबरला निवडक विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
याशिवाय २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत शाश्वत स्कूल, रामगाव येथे नि:शुल्क ‘स्काय वॉचिंग अॅक्टिव्हिटी’ आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त वैज्ञानिक आनंद घैसास हे उपस्थिताना मार्गदर्शन करतील. या प्रदर्शनीला डोळसपणे दिलेली भेट प्रत्येक प्रेक्षकाची विचारशैली, विज्ञान संबोध, आकलन यावर दूरगामी परिणाम घडवू शकेल.
पत्रपरिषदेला प्रसिद्ध मूर्तिकार अतुल जिराफे, श्रीकांत बाभूळकर, पंकज उभाड, डॉ.गणेश वºहाडे, प्रशांत खापेकर, पद्मश्री देशमुख, माधुरी पारडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी करतील उद्घाटन
कॅम्प रोडवरील शाश्वत कन्सेप्ट स्कूल येथे जिल्हाधिकारी अभिजित बांगर २२ नोव्हेंबर रोजी विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करतील. ही प्रदर्शनी २५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली असेल.
वैशिष्ट्य काय?
विद्यार्थी स्वत: विविध प्रयोगांत सहभागी होऊ शकतील. त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी वैज्ञानिक संवाद साधला जाईल. संशोधनाची भूक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, हा या आयोजनाचा उद्देश आहे.