खासगी रूग्णालयांमध्ये आढळल्या कालबाह्य लसी
By admin | Published: June 28, 2014 11:18 PM2014-06-28T23:18:40+5:302014-06-28T23:18:40+5:30
तालुक्यातील कोकर्डा, कापूसतळणी व सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तथा अंजनगाव ग्रामीण रूग्णालयातील शासकीय लसींचा साठा तपासणीअंती नीट असून खासगी रुग्णालयात सापडलेल्या लसी मुदतबाह्य आहेत
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कोकर्डा, कापूसतळणी व सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तथा अंजनगाव ग्रामीण रूग्णालयातील शासकीय लसींचा साठा तपासणीअंती नीट असून खासगी रुग्णालयात सापडलेल्या लसी मुदतबाह्य आहेत व लसवाहक पेटी शासकीय कार्यालयात जमा करण्यात आली आहे, असा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे लसींचा गोरखधंदा चालू असल्याच्या अफवेला काहीही तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शासकीय लसींना पाय फुटल्याने व या लसी कर्मचारी बाहेर पुरवीत असल्याचे तक्रारीवरुन तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १० जून रोजी शहरातील बालरोग तज्ज्ञ पवार, जलील व सारडा या डॉक्टरांकडे अचानक तपासणी केली. या तपासणीत सारडा यांच्या रुग्णालयात एक शासकीय लसवाहक पेटी व त्यात दोन-चार मुदतबाह्य टी.टी., डी.पी.टी. लसी आढळल्या.
याबाबत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, सर्वसामान्य रुग्णांच्या सोयीसाठी शासनाने सारडा हॉस्पिटल मानांकित केले आहे. यामुळे येथे औषधोपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भपात व अतिदक्षता विभागाच्या सेवा घेण्यास व शासकीय सवलती घेण्यास रुग्णांची आणि शासकीय कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच अनवधानाने रुग्णालयात विसरली गेलेली लस वाहक पेटी तपासणी पथकाला आढळली. पण रुग्णालयातर्फे ती शासनजमा करण्यात आली.
ज्यावेळी शासकीय तपासणी पथकाने रुग्णालयाची तपासणी केली. त्यावेळी सारडा मागील सात दिवसांपासून गावात नव्हते. आल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही विविध रोगांच्या दर्जेदार लसी लहान मुलांना पुरवितो व आमच्या रुग्णालयाच्या फ्रिजमध्ये कोणतीच शासकीय लस उपलब्ध नाही.
सापडलेल्या मुदतबाह्य लसी शासकीय लसवाहक पेटीत होत्या व ज्यांची किंमत ३० रूपये आहे. रुग्णालयात भेटी देणाऱ्या शासकीय आरोग्य सेविकांकडून अशी पेटी राहून गेल्यामुळे आम्ही ती शासनाकडे जमा केली. आमच्याकडील लसींची बिलेसुद्धा तपासणी पथकास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कुठलेही गौडबंगाल नसल्याचे स्पष्ट होते. (तालुका प्रतिनिधी)