कविताच्या चिठ्ठीने केले कीर्तिराजचे अत्याचार उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:18 PM2017-12-01T23:18:21+5:302017-12-01T23:18:57+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन नवरा मानसिक व शारीरिक त्रास देत अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मृत कविता इंगोलेच्या चिठ्ठीने उघड केला.
लोकमत आॅनलाईन
अमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन नवरा मानसिक व शारीरिक त्रास देत अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मृत कविता इंगोलेच्या चिठ्ठीने उघड केला. कविताच्या स्वहस्ताक्षराची घरात आढळलेली चिठ्ठी तिचा भाऊ गजानन कटकतलवारे याने पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ती चिठ्ठी नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यास सांगितले असून, नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. कविताच्या या चिठ्ठीमुळे तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे कथन केले आहे.
कविता कटकतलवारे (इंगोले) हिचा ८ नोव्हेंबर रोजी नांदगाव खंडेश्वर ते चांदूररेल्वे रोडवर मृतदेह आढळून आला होता. कविताच्या हत्याप्रकरणात नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी तिचा पती कीर्तिराज इंगोलेला अटक केली. त्यानेही हत्येची कबुली दिली. याप्रकरणाचा तपास अत्यंत गोपनिय पद्धतीने सुरु असल्यामुळे नातेवाइकांना माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते. या प्रकरणाचा तपास योग्य व पारदर्शक व्हावा आणि पोलिसांनी तपासाची माहिती द्यावी, अशी मागणी नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. दरम्यानच्या काळ्यात कविताच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी भाऊ गजाननला घरातच आढळून आली. ती पतीच्या अत्याचाराचे कथन करीत होती. चिठ्ठीनुसार, माझा नवरा, मला मानसिक व शारीरिक त्रास देतो, एकदा पतीने रात्रभर मला मारझोड करून आईच्या घरी नेऊन दिले. मुलगी चारित्र्यहीन असल्याचे सांगून वडिलांचा अपमान केला. मोबाइल हिसकावून घेतला. गाडीची चावी ठेवून घेतली. नेहमीच जिवे मारण्याची धमकी मिळायची एके दिवशी मुलांसमोरच गळ्या दाबला. गाडीवरून पडल्यामुळे मानेच्या मणक्यात गॅप आल्याने माझ्याकडून जास्त कामे होत नाही. मानसीक ताणामुळे अॅसीडीटीच्या त्रास होत होता. मात्र, मला रात्रभर निट झोपू देत नाही. त्यामुळे माझा आजार वाढतच होता. सासू काम करायला लागली की, मला झोपेतून उठून कामे करण्यास भाग पाडायचे. कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हतीच. बॅकेचे पासबूक व एफडी कार्ड हिसकावून घेतले, माझे शैक्षणिक दस्ताऐवज माहेरवरून जबरदस्तीने हिसकावून घरात ठेवले. ती चिठ्ठी तिच्या भावाच्या हाती लागल्यामुळे कवितावरील अन्यायाला वाचा फुटली आहे.
मृताच्या भावाने चिठ्ठी आमच्या स्वाधीन केली आहे. ती चिठ्ठी कवितानेच लिहिली किंवा अन्य कोणी, यासाठी ती चिठ्ठी नागपूर येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.
- मगन मेहते,
पोलीस निरीक्षक,
नांदगाव खंडेश्वर ठाणे.