पीक विम्याला ३१ जुलैपर्यत मुदतवाढ
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 15, 2024 07:06 PM2024-07-15T19:06:45+5:302024-07-15T19:07:13+5:30
केंद्रांवर गर्दी, सहभाग कमी : सोमवारी दुपारपर्यंत ३.४६ लाख शेतकरी नोंदणी
अमरावती : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपयात सहभाग घेता येतो. गतवर्षी ५.०५ लाख शेतकऱ्यांचा सहभाग लाभला होता. त्यातुलनेत यंदा शेवटच्या दिवशी म्हणजेच १५ जुलै रोजी दुपारी २ पर्यंत फक्त ३.३६ लाख शेतकरी सहभाग लाभला आहे. सीएससी केंद्रांवर गर्दी, नेटचा खोडा यामुळे शेतकरी सहभागापासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र शासनाने योजनेत शेतकरी सहभागासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खन, दुष्काळ, पावसातील खंड, किंड व रोग इत्यादी बाबीं मुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबीचा योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते यांनी दिली.
योजनेतंर्गत विमा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकरी हिस्सा राज्य शासन भरणा करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयाच्या नोंदणीमध्ये योजनेमध्ये सहभाग घेता येतो.
‘लाडक्या बहिणी’चाही फटका
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रासाठी सध्या आपले सरकार सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे व या सेतूचालकांनी सीएससी केंद्राचे देखील परवाने घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागासाठी या केंद्रात जावे लागते. या केंद्रात मोठी गर्दी असल्याने सर्वांचा जोर सध्या याच योजनेत असल्याने शेतकरी सहभाग कमी लाभल्याचे सांगण्यात आले.
"सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होता यावे, यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवावा."
- किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक