विद्यापीठात पीएचडी प्रवेशासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:10 PM2019-01-01T22:10:31+5:302019-01-01T22:10:58+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, आता ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. एम.फील. विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील अडसर तसेच नवीन संशोधन केंद्रांची नावे जाहीर करावयाची असल्याने ही मुदतवाढ कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, आता ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. एम.फील. विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील अडसर तसेच नवीन संशोधन केंद्रांची नावे जाहीर करावयाची असल्याने ही मुदतवाढ कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.
विद्यापीठात पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत बरेच अडथळे येत आहेत. एम.फील. विद्यार्थ्या$ंच्या प्रवेशातील अडचणींमुळे दिवसेंदिवस या प्रक्रियेला उशीर होत चालला आहे. सिनेटमध्ये एम.फील. विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्याचे मान्य केल्याने ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येणारी प्रवेशाची मुदत वाढवून ३० जानेवारी २०१९ अशी करण्यात आली आहे.
प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ जानेवारीऐवजी १५ फेब्रुवारी अशी मुदत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वाढवून दिली आहे.
एम.फील.बाबत निर्णय केव्हा?
विद्यापीठात अगोदर एम.फील.ची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी कोर्स वर्कमधून सूट देण्यासंदर्भात अधिष्ठात्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यावर कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. विद्यापीठाने प्रवेशाची मुदत वाढवली असली तरीही यावर लवकरात लवकर निर्णय होण्याच्या अपेक्षेत विद्यार्थी आहेत.
१२१५ विद्यार्थी पॅट उत्तीर्ण
मार्च आणि सप्टेंबर महिन्यात पॅट परीक्षांचे निकाल लागले असून, त्यात अनुक्रमे ११५३ आणि ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याव्यतिरिक्त नेट-सेट आणि एमफील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनादेखील पीएच.डी.साठी प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील १०३ केंद्रांवर हे प्रवेश दिले जाणार असून, जानेवारी महिन्यात आणखी काही संशोधन केंद्रे जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.