आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:24+5:302021-07-02T04:10:24+5:30
अमरावती : आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियाअंतर्गत सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १९८० विद्यार्थ्यांची ...
अमरावती : आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियाअंतर्गत सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १९८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याकरिता ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या प्रकोपामुळे २० दिवसात केवळ ४९२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये नर्सरी आणि पहिल्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी १४ तालुक्यातील २४४ शाळांमध्ये प्रवेशाकरिता ५,९१८ अर्जांपैकी सोडतीत १,९८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या सर्वांना ११ जूनपासून प्रवेश घेण्याची सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंद होत्या. परिणामी, प्रवेश घेण्यास अडचणी येत असल्याने ३० जूनपर्यंत दिलेल्या मुदतीत केवळ ४९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही १,४८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्यामुळे, आता पुन्हा या प्रक्रियेला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश केला नाही किंवा पालकांना अजूनही लॉटरी लागल्याचे कळले नाही, त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्याविषयी कळवावे, असे निर्देश शिक्षण संचालकांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोट
आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियाअंतर्गत जिल्ह्यातील १,९८० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ३० जूनपर्यंत ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता यावे, यासाठी वरिष्ठ स्तरावरून ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानुसार पालकांनी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
बॉक्स
तालुकानिहाय प्रवेश निश्चित संख्या
अमरावती ७१, अमरावती मनपा ६३, अंजनगाव सुर्जी ५७, चांदूर रेल्वे ८, दर्यापूर १०२, धामणगाव रेल्वे ४४, मोर्शी ५४ आणि वरुड ५८ याप्रमाणे तालुकानिहाय प्रवेश निश्चित झाले आहेत. अचलपूर, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या तालुक्यांमध्ये एकही प्रवेश निश्चित झाला नसल्याचे शिक्षण विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.