परदेश शिष्यवृत्तीसाठी अजर स्वीकारण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:02+5:302021-06-25T04:11:02+5:30
अमरावती : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ...
अमरावती : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना १८ जून २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदत वाढ देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुदतवाढ दिल्याने अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० जूनच्या आत अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आवाहन समाजकल्याण आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.