परीक्षा अर्जास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:17 PM2018-08-31T22:17:38+5:302018-08-31T22:18:20+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी ‘विद्यापीठाने एकाच विद्यार्थिनीला दिल्या दोन गुणपत्रिका’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित करून परीक्षा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी या वृत्ताची दखल घेत आॅक्टोबरच्या परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा अर्ज भरण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा आदेश विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या स्वाक्षरीने जारी झाला आहे. यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, हे विशेष. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी भाग-२ सेमिस्टरच्या तृतीय परीेक्षेसाठी हा नियम लागू राहील. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज ७ सप्टेंबरपर्यंत, तर महाविद्यालयांना विद्यापीठात परीक्षा अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावे लागतील. महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून विहीत विलंब शुल्कासह १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारतील, तर महाविद्यालयांना विद्यापीठास १९ सप्टेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करावे लागणार आहेत, असे आदेशात नमूद केले आहे.
उशिरा निकालाचा भुर्दंड आम्ही का भरावा?
चांदूर रेल्वे येथील कला, वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना बी.ए. भाग १ (सेमिस्टर २) निकालाची गुणपत्रिका २५ आॅगस्ट रोजी मिळाली. या गुणपत्रिकेवर ४ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर झाल्याचे अंकीत आहे. दरम्यान, परीक्षा अर्जासोबत विलंब शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयाकडून करण्यात आली. परंतु, गुणपत्रिका विलंबाने मिळाल्या, तर भुर्दंड कशासाठी भरावा, असे गाºहाणे शुंभागी घोरपडे, स्नेहल गोंडाने, सोनाली विरूडकर, भारती भगत, मीरा चव्हाण, नेहा पाटमासे आदींनी प्राचार्यांपुढे मांडले.
गरीब, सामान्य विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज विलंब शुल्क का सहन करावा, हादेखील महत्त्वाचा भाग आहे. परंतु, विद्यापीठाने परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
- प्रा. प्रदीप दंदे
जिल्हाध्यक्ष, रिपाइं