भूखंडांची नियमबाह्य विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:26 PM2018-03-17T22:26:25+5:302018-03-17T22:26:25+5:30
जुन्या शहरानजीक पाडलेल्या बहुतांश भूखंडांची अटी व शर्तींना मूठमाती देत अनधिकृतरीत्या विक्री सुरू असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशीची मागणी होत आहे.
सुनील देशपांडे ।
आॅनलाईन लोकमत
अचलपूर : जुन्या शहरानजीक पाडलेल्या बहुतांश भूखंडांची अटी व शर्तींना मूठमाती देत अनधिकृतरीत्या विक्री सुरू असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशीची मागणी होत आहे.
अचलपूर-परतवाड्यासह कांडली आणि नारायणपूरनजीक सर्वाधिक प्लॉट पाडलेले आहेत. सात वर्षांपूर्वी देवमाळी ही नवीन ग्रामपंचायत उदयास आली. आता मल्हारा गावाकडेही प्लॉट पाडले जात आहेत. ले-आऊट पाडण्यासाठी शेतजमिनीच्या मालकीसंदर्भात कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यापूर्वी शासकीय मान्यतेसाठी महसूल विभागाकडे अर्ज करावा लागतो. अशा जमिनी खासगी व्यक्ती विकत घेतात. परंतु, हा सौदा केवळ एका स्टॅम्पवर करून तो शेतमालक आणि व्यापारी यांच्यातच राहतो. खासगी व्यापारी शेतमालकाला हवी ती रक्कम देऊन शेती नावावर करतो आणि महसूलची मान्यता मिळताच भूखंड पाडले जाते. मात्र, प्लॉटच्या विक्रीसाठी तेथे रस्ते, विद्युतीकरण, खुले मैदानाची सोय होणे अनिवार्य असताना प्लॉटविक्रेता कसलीही सोय न करता थेट प्लॉट विकताहेत. त्यामुळे प्लॉटधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही लब्धप्रतिष्ठितांनी गुंतवणुकीच्या हिशेबाने १५ ते २० प्लॉटची खरेदी केलेली आहे. याबाबत कुणी 'ब्र' काढल्यास साम, दाम, दंड पद्धतीने त्याची मुस्कटदाबी केली जाते. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
ग्रामपंचायतींवर जबाबदारी
तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये प्लॉटची संख्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सोयी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे प्लॉट विक्रीस परवानगी देणाºया अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी भाजपा शहर उपाध्यक्ष श्रीधर क्षीरसागर यांनी केली आहे.
सुविधांचा अभाव
देवमाळी भागातील हनुमाननगर, गुलमोहर कॉलनी, केदारनगरसह आदी ले-आऊटमध्ये रस्ते, नाल्या व इतर सुविधांचा अभाव आहे. जेमतेम ग्रामपंचायतीने हनुमाननगरात रस्त्याची सोय केली खरी; पण नाल्याअभावी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे, अशी प्रतिक्रिया विवेक मालगे 'लोकमत'शी बोलताना दिली.
तुकडे बंदी कायदा लागू असल्याने कृषक जमिनी विकता येते. परंतु अकृषक जमिनी विकता येत नाही, त्यामुळे या कायद्याचा अभ्यास करूनच प्लॉटची खरेदी करावी.
- निर्भय जैन, तहसीलदार, अचलपूर