‘अतिरिक्त कमाई’चा हव्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:33 PM2018-09-02T22:33:15+5:302018-09-02T22:38:18+5:30
ग्राहक हक्क संरक्षण कायद्यानुसार वस्तू, साहित्य विक्री आणि खरेदीत ग्राहकांची फसवणूक होता कामा नये. असे असताना या कायद्याची बोळवण चालविली आहे. विविध चार्जेस आकारून ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा जादा दर आकारला जातो.
अमरावती : ग्राहक हक्क संरक्षण कायद्यानुसार वस्तू, साहित्य विक्री आणि खरेदीत ग्राहकांची फसवणूक होता कामा नये. असे असताना या कायद्याची बोळवण चालविली आहे. विविध चार्जेस आकारून ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा जादा दर आकारला जातो. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. परंतु, ग्राहकांची होणारी सार्वत्रिक फसवणूक लक्षात घेता, ग्राहक संरक्षण यंत्रणा आहे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो.
रेस्टॉरेंटमध्येही अधिक किंमत
शहरातील अनेक रेस्टॉरेंटमध्येही साधा पाणी की बिसलेरी असे सुरुवातीलाच विचारले जाते. बिसलेरीच्या एक लिटर बॉटलची छापील किंमत १८ ते २० रुपये असताना, अनेक ठिकाणी २५ ते ३० रुपये आकारले जातात.
सिनेमागृहात पॅकबंद पाणी बॉटलचे २५ रुपये
एक लिटर पाण्याच्या बाटलीचा दर हा रेल्वे स्थानक, बस स्थानक, हॉटेल, रेस्टॉरेंट या ठिकाणी वेगवेगळा असतो, असा अनुभव अनेकदा येतो. एमआरपीपेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शनिवारी शहरातील तीन सिनेमागृहांमध्ये जाऊन बाटलीबंद पाण्याच्या किमतीबाबत खातरजमा केली. त्यात शहरातील एका मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृहात १८ रुपये छापील किंमत असलेल्या एक लिटर बाटलीबंद पाण्यासाठी २५ रुपये आकारण्यात आले, तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिनेमागृहात त्याच बॉटलसाठी २० रुपये घेण्यात आले. अन्यत्र २५ रुपयेच का, अशी विचारणा केल्यावर १८ रुपयेच द्या, अशी नरमाईची भूमिका घेण्यात आली. एमआरपी १८ ते २० रुपये असताना २५ व ३० रुपये का, अशी विचारणा केल्यानंतर आम्हाला फ्रीजरचा खर्च लागतो, असे उत्तर मिळाले. शीतपेयाच्या बॉटलवर ४५ रुपये किंमत असताना, त्यासाठी ५० रुपये आकारण्यात आले. पाण्याच्या बाटलीसाठी एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या दुकानदारांना दंड होईल तसेच त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागेल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली होती. फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स आॅफ इंडियाने याचिका दाखल केली होती. त्याला उत्तर देताना ग्राहक व्यवहार मंत्रालयाने प्री-पॅक्ड किंवा प्री-पॅकेज्ड वस्तूंवर छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारणे लीगल मेट्रोलॉजी अॅक्ट अंतर्गत गुन्हा मानला जातो, असे म्हटले होते. आदेशाचे विशेषत: सिनेमागृहात सर्रास उल्लंघन होत आहे.
रेल्वे प्रवाशांची लूट
शासनाने कितीही कठोर निर्देश दिले तरी रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ व शीतपेये विक्री छापील किमतीपेक्षा जादा दराने होत असल्याचे स्पष्ट आहे. बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर छापील किमतीपेक्षा पाच रुपये अतिरिक्त घेतले जातात. रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ दरावर नियंत्रण कुणाचेही नाही तसेच ब्रँडेड कंपन्यांचे शुद्ध जल मिळत नाही. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार, स्टेशनवर निर्धारित कंपनी किंवा रेल्वेने ठरविलेल्या कंपन्यांचे शुद्ध जल विक्री होणे नियमावली आहे. परंतु, एक लिटर पाणी बॉटलसाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. विशेषत: लोकल कंपन्यांचे शुद्ध जल येथे विकले जात आहे. लोकल कंपन्यांचे हे पाणी पिण्यास योग्य आहे अथवा नाही, हे तपासले जात नाही. केवळ बॉटल थंड करून शुद्ध जल विकण्याच्या गोरखधंदा सुरू आहे. पाकीटबंद खाद्यपदार्थ छापील किमतीपेक्षा पाच रुपये प्रवाशांना जास्त मोजावे लागत आहे. यात बिस्कीट, पाणी बॉटल, चिप्स आदींचा समावेश आहे.
पाच रुपये वसूल
शीतपेये, शुद्ध जल बॉटलची विक्री करताना रेल्वे स्टेशनवर कूलिंग चार्ज पाच रुपये वेगळे वसूल केले जातात. रेल्वे अधिकारी हा लूट मूकपणे बघतात.
धावत्या गाड्यांंमध्ये अवैध खाद्यपदार्थ विक्री
धावत्या रेल्वे गाडीमध्येही खाद्यपदार्थाच्या पाकिटावर छापील किमतीपेक्षा पाच रुपये जास्त घेऊन प्रवाशांची लूट हा येथील शिरस्ताच झाला आहे. चहा, कॉफी, दूध व शीतपेयेसुद्धा अधिक दराने विकली जातात.
पदार्थ विक्रीचा दर्जा निकृष्ट
बडनेरा रेल्वे स्टेशनवर समोसे, कचोरी, बटाटे व पालकवडे हे कँटीन कंत्राटदाराकडून तयार करून विकले जातात. मात्र, ते अतिशय निकृष्ट दर्जाचे तयार केले जाते. हे खाद्यपदार्थ तयार करताना वापरले जाणारे साहित्य तपासणारी यंत्रणा नाही. कंत्राटदारांच्या मर्जीनुसार खाद्यपदार्थ तयार करून विकले जात आहे. यात रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस जबाबदार आहे. पाच कँटिनवर हा प्रकार सुरू आहे.
काय आहे नियम?
लीगल मेट्रोलॉजी एक्टच्या कलम-३६ नुसार जर कोणी व्यक्ती छापील किमतीपेक्षा जास्त किमतीत एखादी वस्तू विकताना आढळल्यास त्याला पहिल्यांदा असा गुन्हा केल्यामुळे २५ हजारांचा दंड आकारला जाईल. पुन्हा त्याने ही चूक केल्यास ५० हजारांचा दंड आणि पुनरावृत्ती करीत राहिल्यास एक लाखाचा दंड किंवा एक वर्षाचा तुरुंगवास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
मध्यवर्ती स्थानकात १८ ची बॉटल २० रुपयांत
शुद्ध जल बॉटलवर छापील किंमत १८ रुपये व विक्री २० रुपयांना होते. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात आतील भागात असलेल्या एका अॅपल ज्यूस विक्री स्टॉलमध्ये हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. सदर विक्रेत्याला छापील किमतीची जाणीव करून दिल्यानंतर त्याने १८ रुपये घेतले. मात्र, चिलिंगसाठी दोन रुपये घेत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, उत्पादक शुद्ध जलाची बॉटल दहा रुपयांत उपलब्ध करतो. म्हणजे आठ रुपयांचा सरसकट नफा हाती येत असताना, दोन रुपये अतिरिक्त उकळले जात असल्याचे ‘लोकमत’ चमूने उघड केले.