रेल्वे स्थानकांच्या अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:52 PM2018-05-28T23:52:03+5:302018-05-28T23:52:20+5:30
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण केले असून, काही महिन्यातच व्यापारी संकुल निर्मितीला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विनावापर जागेचा कायापालट होऊन रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण केले असून, काही महिन्यातच व्यापारी संकुल निर्मितीला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विनावापर जागेचा कायापालट होऊन रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहे.
राज्यातील ३८ रेल्वे स्थानकांचा बीओटी तत्त्वावरील पुनर्विकासात समावेश असून, ‘अ’ वर्गात मोडणाऱ्या अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. अतिरिक्त जागेचा व्यवसायासाठी वापर करण्याचे प्रस्तावित आहे. साकारलेल्या भव्य मॉडेल रेल्वे स्थानकाची देखभाल, दुरुस्तीसाठी मोठी यंत्रणा लागत असल्याने रेल्वेला आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परंतु, येत्या काळात अमरावती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास झाल्यास उत्पन्नातून येणारी रक्कम या स्थानकावर खर्च करून प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा देण्यावर भर राहणार आहे. इर्विन परिसरात अतिरिक्त जागा असून या जागेवर व्यापारी संकुल उभारल्यास मोठी रक्कम रेल्वेला मिळेल, असा अंदाज आहे. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना अतिरिक्त जागेवर व्यापारी संकुल निर्माण करताना खासगी क्षेत्रासह सर्व इच्छुकांकडून स्पर्धात्मक निविदा मागवण्यिाचे धोरण आहे. या नव्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयीसुविधा पुरविताना कोणताही खर्च लागणार नाही, हे विशेष. या अतिरिक्त जागेच्या अनुषंगाने निविदाकर्ता कल्पकतेनुसार व डिझाईननुसार रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करेल, असे या योजनचे स्वरुप आहे. काही वर्षांपासून ओस पडलेल्या अतिरिक्त जागेचा कमर्शियल वापर होणार असल्याने रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध होईल. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांच्या आदेशानुसार या अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण झाले आहे.
पुणेच्या कन्सलटंसीकडून सर्वेक्षण
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाच्या अतिरिक्त जागेवर साकारण्यात येणाºया व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी पुणे येथील कन्सलटंसीने जागेचे सर्वेक्षण केले आहे. अतिरिक्त जागेचे मोजमाप करून व्यापारी संकुल निर्मितीसाठी वापर योग्य जागेचा अहवाल रेल्वेच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत व्यापारी संकुल निर्मितीच्या ई-निविदादेखील काढण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
अमरावती रेल्वे स्थानकाच्या अतिरिक्त जागेसंदर्भात यापूर्वीच सर्वेक्षण झाले आहे. इर्विन रूग्णालयाच्या बाजूकडील जागेवर व्यापारी संकुल प्रस्तावित आहे. त्यानंतरची कार्यवाही डीआरएम कार्यालयस्तरावरून होत आहे.
- सुनील वासेकर
विभागीय अभियंता, बडनेरा