अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात अतिवृष्टी, चार नद्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:32 AM2019-08-09T11:32:54+5:302019-08-09T11:33:50+5:30
धारणी तालुक्यात २४ तासात तब्बल १२५.१ मिमी पाऊस बरसला. या अतिवृष्टीमुळे धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपूरमधील सपन व मोर्शी तालुक्यातील चारघड नदीला पूर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धारणी तालुक्यात २४ तासात तब्बल १२५.१ मिमी पाऊस बरसला. या अतिवृष्टीमुळे धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपूरमधील सपन व मोर्शी तालुक्यातील चारघड नदीला पूर आला आहे. दरम्यान धारणी तालुक्यातील सिपना व गडगा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला आहे.
गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस पडला. त्यात धारणी तालुक्यातील चार व चिखलदरा व दर्यापूर तालुक्यातील प्रत्येकी एक अशा सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. दिया, उतावली व रोहिणीखेडा येथील सिपना नदीवरील पूल पाण्याखाली गेले. याशिवाय दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात मासे वाहून गेले. तर सुमारे २०० एकर जमीन पाण्याखाली आली. पूर्णा वगळता शहानूर व चंद्रभागा प्रकल्पाची दोन, तर सपन मध्यम प्रकल्पाची चार दारे गुरुवारी उघडण्यात आली. २४ तासांतील पावसामुळे कुठेही प्राणहानी किंवा आपाद परिस्थिती उद्भभवली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.