शिवसेनेत कमालीची अस्थिरता

By Admin | Published: November 22, 2014 12:01 AM2014-11-22T00:01:33+5:302014-11-22T00:01:33+5:30

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेत कमालीची अस्थिरता पसरली आहे.

Extremely volatile Shiv Sena | शिवसेनेत कमालीची अस्थिरता

शिवसेनेत कमालीची अस्थिरता

googlenewsNext

अमरावती: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेत कमालीची अस्थिरता पसरली आहे. निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून काहींना घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय पक्षश्रेठींनी घेतल्यामुळे किती पदाधिकाऱ्यांची ‘विकेट’ पडणार याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा खा. आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी नुकतीच विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत पराभवाची कारणमीमांसा, पदाधिकाऱ्यांची भूमिका आदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने बडनेरा, तिवसा व धामणगाव रेल्वे मतदारसंघात पारभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख व महपालिकेतील विरोधी पक्षनेते दिगंबर डहाके यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्याकडे असलेले विरोधी पक्षनेता पदावर गंडातर आणले. एवढेच नव्हे तर महानगर प्रमुखपदालाही स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. तसेच धामणगाव मतदारसंघात विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत उपजिल्हाप्रमुख मनोज कडू यांनाही पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात या दोघांवरच कारवाईचा निर्णय घेण्यात आला असून येत्या काळात पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक घेऊन ज्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले असेल, अशा सर्वांवर कारवाईचे संकेत खा. अडसूळ, पक्ष निरीक्षक अनिल चव्हाण यांनी घेतल्याची माहिती आहे. खासदार अडसूळ हे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत, त्यांच्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेनेत बोटावर मोजण्या इतके प्रामाणिक शिवसैनिक शिल्लक आहेत. शिवसैनिकांवर पक्षविरोधी कारवाई केली जात असेल तर याविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागू अशी भूमिका दिगंबर डहाके, मनोज कडू यांनी घेतली आहे. दिंगबर डहाके यांच्या जागी युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण हरमकर यांच्याकडे महापालिकेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घमासान झाले. अखेर सभा स्थगित करण्यात आली. कारवाई करताना कोणते निकष लावले याचा खुलासा करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. खासदारांनी जिल्ह्यातील शिवसेना ‘लंबी’ केली ही बाब काही जुने पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती आहे. संपर्क प्रमुख पदही त्यांच्यापासून काढून घेण्याची मागणी करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. शिवसेनेत जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आदींवर कारवाईचे संकेत असल्यामुळे पक्षात अस्थिरता पसरली आहे.

Web Title: Extremely volatile Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.