डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प, ४८९ रुग्ण वेटींगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:12 AM2021-05-14T04:12:46+5:302021-05-14T04:12:46+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र चिकित्सालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोतीया बिंदू, काचबिंदूच्या मोफत शस्त्रिक्रियेसाठी बहुतांश वृद्ध महिला-पुरुष येतात. त्यामुळे टार्गेट ५७८२ ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र चिकित्सालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोतीया बिंदू, काचबिंदूच्या मोफत शस्त्रिक्रियेसाठी बहुतांश वृद्ध महिला-पुरुष येतात. त्यामुळे टार्गेट ५७८२ पेक्षा किती तरी पट अधिक शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल राज्यातून दुसरा क्रमांक या विभागाने सन २०१८ मध्ये पटकावले होते. सन २०१९ मध्ये ५२३३, सन २०२० मध्ये ३३५० मात्र मार्च २०२० पासून सतत कोरोनाचे सावट राहिल्याने तसेच येथील बांधकामामुळे यंदा केवळ यंदा ८३० मोतीया बिंदू शस्त्रक्रिया, ३४ अन्य सर्जरी झाल्याची माहिती डॉ. गोयनका यांनी दिली.
बॉक्स
एप्रिलमध्ये काचबिंदूच्या नऊ शस्त्रक्रिया
मार्च २०२० पासून कोरोनाचे सावट राहिल्याने मोतिया बिंदू तसेच काचबिंदू शस्त्रक्रिया करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातच कोरोना नियमावलीचे पालन करून सर्व प्रक्रिया पूर्ण करताना ४८९ शस्त्रक्रिया पेंडिंग ठेवाव्या लागल्या. वेळेत शस्त्रक्रिया होऊ न शकल्यामुळे काहींना मोतीया बिंदूनंतर काचबिंजूची समस्या निर्माण झाली. त्यांना कायम अंधत्व येऊ नये, यासाठी एप्रिल महिन्यात नऊ जणांची काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोट
कडक लॉकडाऊनमध्ये वाहनदेखील मिळाले नाही. त्यामुळे ओपीडी संपल्यानंतर इर्विन रुग्णालयात पोहचलो. मात्र, डॉक्टरांनी भरती करून घेतले. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने एका डोळ्याची शस्त्रक्रिया केली. आता मला एका डोळ्याने स्पष्ट दिसत आहे.
- भानुदान पारिसे,
रुग्ण, दहिगाव पूर्णा
सध्या कोरोनाने संपूर्ण आरोग्य विभागाचे लक्ष वेधले आहे. जीव महत्त्वाचे आहे, तसेच दृष्टीही महत्त्वाची आहे. मोतीया बिंदू शस्त्रक्रिया वेळेत न केल्यास काचबिंदूचा धोका उदभवतो. त्यातही दुर्लक्ष झाल्यास कायमचे अंधत्व येते. त्यामुळे शासनाने यातही थोडी सूट द्यायला हवी.
- नम्रता सोनोने,
नेत्र चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय
जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रियेसाठी भरती होणाऱ्या रुग्णांकरिता व्यवस्था चांगली आहे. कोरोना काळात अत्यंत काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी केली गेले. कुठलाच त्रास झाला नाही.
- किसनराव गावंडे, श्रीकृष्णनगर, अमरावती
-
माझ्या डोळ्याचे ऑपरेशन येथील डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे केले. मोफत सेवेतही आम्हाला कुठल्याच प्रकारची उणीव भासू दिली नाही. सर्व प्रकारची व्यवस्था केली गेली. वेळेवर नाश्टा, जेवण, चहाची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही शासनाचे ऋणी आहोत.
- बाबूराव ढोके,
बोरखडी खुर्द