‘याची देही याची डोळा, मरण मी पाहिले’; मृत्यूला स्पर्शून गेलेला प्रवास!

By admin | Published: May 8, 2017 12:01 AM2017-05-08T00:01:51+5:302017-05-08T00:01:51+5:30

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शांत वातावरणात अचानक किंंकाळ्या गुंजल्या...काही तरी विपरीत घडत असल्याची क्षणभर जाणीव झाली..

'The eyes of this god, I saw the death'; Journey to death! | ‘याची देही याची डोळा, मरण मी पाहिले’; मृत्यूला स्पर्शून गेलेला प्रवास!

‘याची देही याची डोळा, मरण मी पाहिले’; मृत्यूला स्पर्शून गेलेला प्रवास!

Next

प्रकृती धोक्याबाहेर : धामणगावच्या माजी नगराध्यक्षांनी कथन केली ‘आपबिती’
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शांत वातावरणात अचानक किंंकाळ्या गुंजल्या...काही तरी विपरीत घडत असल्याची क्षणभर जाणीव झाली..आणि मृत्यूचा अटळ प्रवास सुरू झाल्याची पुसटशी जाणीव झाली आणि क्षणात सगळे काही धुसर होत गेले. जाग आली तोवर सगळे होत्याचे नव्हते झाले होते. मृत्युने केलेल्या पाठशिवणीत आपण कसे बरे जिंकलो..हा प्रश्न आजही पडतोेय. आपले प्राण वाचले म्हणून आनंद साजरा करावा की सहप्रवाशांचा असा करूण अंत झाल्याचा शोक करावा, काहीच कळत नाही, अशा शब्दांत धामणगावच्या माजी नगराध्यक्ष अर्चना व सतीश राऊत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात.
चारधाम यात्रेसाठी मोठ्या उत्साहात आणि जय्यत तयारीनिशी घराबाहेर पडताना वाटेत मृत्यू असा दबा धरून बसला असेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. पाच दिवसांचा प्रवास सुखरूप, आनंदात पार पडला. मात्र, सहावा दिवस उगवला तो भयाण मृत्युचे सावट घेऊनच. देहरादून येथील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत यांना आजही या अपघातातून सहकुटूंब सुखरूप बाहेर आल्याच्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. नाही म्हणायला पती आणि मुलगी सुखरूप असल्याचे समाधान त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
राऊत कुटुंबिय सतीश, अर्चना व त्यांची मुलगी आर्या हे १ मे रोजी उत्तराखंडमध्ये देवदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक कृषी अधिकारी संजय पाटील यांच्यासोबत निघाले होते. त्यांचा पाच दिवसांचा प्रवास अगदी हसतखेळत झाला. केदारनाथ येथील दर्शन घ्यावे व परतीच्या प्रवासाला निघावे, असे नियोजन होते. सकाळी नाश्ता झाल्यानंतर प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये बसले. गंगोत्री ते केदारनाथ मार्गावरील टेहरीवाल जिल्ह्यातील चंगोरा गावाजवळ अकस्मात वाहन क्र. एच.आर.७९ बी.२७१८ वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच क्षणार्धात वाहन तब्बल ३०० फूट खोल दरीत पडले.

तातडीने मिळाली मदत
धामणगाव रेल्वे : अर्चना राऊत सांगतात, त्यावेळी आमच्या संवेदना जागृत होत्या. आम्ही सर्वजण केवळ देवाची आराधना करीत होतो. अवघ्या काही वेळात घटनास्थळी पोेलिसांचा ताफा पोहोचला. या अपघातात अर्चना राऊत यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली. त्यांचे पती सतीश, मुलगी आर्या हे देखील सुखरूप आहेत.
अरूण अडसड यांची तत्परता
भाजप नेते अरूण भाऊ अडसड यांना या भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संपर्क साधला. लगोलग टेहरीवाल जिल्ह्याचे कलेक्टर स्वत: अपघातस्थळी रवाना झालेत. विशेषत: मुख्यमंत्री रावत यांनी स्वत: लक्ष घालून जखमींना त्वरित उपचार उपलब्ध करून दिलेत. अपघातातील जखमी माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत व राऊत कुटुंबियांची तासातासाला अडसड चौकशी करीत आहेत.

मुलगी, पती सुखरूप असल्याचा आनंद
अपघातानंतर रूग्णालयात नेले असता पती आणि मुलगी कशी असेल, याची रूखरूख होती. त्या दोघांचे चेहरे बघितल्याशिवाय पाण्याचा घोटही घशाखाली उतरला नाही. मनात वाईट विचारांचे काहूर माजले होते. मात्र, आर्या आणि सतीश राऊत सुखरूप असल्याचे पाहून अतिव आनंद झाला. मात्र, दुसऱ्याच क्षणी जावई संजय पाटील यांचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडली आणि मोठा धक्का बसला, असे अर्चना राऊत यांनी सांगितले.

Web Title: 'The eyes of this god, I saw the death'; Journey to death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.