इवल्याशा विवानच्या डोळ्यांनी मिळेल दोन अंधांना दृष्टी !
By admin | Published: August 26, 2016 12:12 AM2016-08-26T00:12:58+5:302016-08-26T00:12:58+5:30
दोन वर्षीय चिमुरडा विवानचे छातीच्या आजाराने गुरूवारी सकाळी निधन झाले. या दु:खाच्या प्रसंगातून सावरत हिरडे दांपत्याने त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला
अमरावती : दोन वर्षीय चिमुरडा विवानचे छातीच्या आजाराने गुरूवारी सकाळी निधन झाले. या दु:खाच्या प्रसंगातून सावरत हिरडे दांपत्याने त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला आणि सामाजिक बांधिलकी जपली. विवानच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळाली.
महेंद्र कॉलनीतील रहिवासी डॉ. मुरलीधर व शिक्षिका प्रिती हिरडे यांच्या निर्णयामुळे विवानच्या डोळ्यांनी दोन नेत्रहीन हे सुंदर जग पाहणार आहेत. काही अत्यंत दुर्लभ गोष्टी निसर्गाने मानवाला जन्मजात बहाल केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे दृष्टी. डोळ्यांशिवाय जगण्याची कल्पनाच करवत नाही. परंतु काही अभागी व्यक्ती विविध कारणांमुळे दृष्टीसुखापासून वंचित राहतात. त्यांचे जीवन अंध:कारमय होते. अशा व्यक्तींच्या जीवनात नेत्रदानाने प्रकाश येऊ शकतो. हिरडे दांपत्याने दु:ख बाजूला सारून विवानचे नेत्रदान केले. नेत्रशल्य चिकित्सक कुणाल वानखडे व समुपदेशक उद्धव जुकडे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी हिरडे दांपत्याला धीर देऊन त्यांच्या या समाजाभिमुखतेचे कौतुक केले.
मरणोपरांत नेत्रदान : दु:ख बाजूला सारून हिरडे दाम्पत्याने जपले समाजभान
नेत्रदान हे श्रेष्ठदान!
मृत्युपश्चात स्वत:चे डोळे दान करणे म्हणजे नेत्रदान. यामुळे व्यक्ती मृत्युनंतरही दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो. मृत्युनंतरही जीवंत राहण्याची संधी यामुळे मिळते. दान केलेले बुब्बुळ (डोळे) नेत्रशल्यचिकित्सकांना मोफत पुरविण्यात येतात. एका व्यक्तीकडून प्राप्त दोन डोळे (कार्निया) दोन अंधांना लाऊन त्यांना दृष्टीलाभ देण्यात येतो.
नेत्रदानासाठी
आवश्यक बाबी
मृत्युुनंतर मृत व्यक्तिचे डोळे त्वरित बंद करावेत. डोळ्यांवर ओले स्वच्छ कापड ठेवावे. डोक्याखाली उशी ठेवावी. मृत्युनंतर जवळच्या नेत्रपेढीस त्वरीत कळवावे. मृत्युनंतर चार ते सहा तासांच्या आता डोळे काढल्यास ते प्रत्यारोपणास उपयोगी पडू शकतात.
नेत्रदान पंधरवड्याची सुरूवात विवानच्या नेत्रदानाने
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान नेत्रदान पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याची सुरुवात विवान या दोन वर्षीय बालकाच्या मरणोपरांत नेत्रदानाने झाली. हिरडे दाम्पत्यांने दु:खातून सावरत हे आगळे कार्य पार पाडले.
हिरडे कुटुंबाने दु:खातून सावरत दोन वर्षीय मुलाचे नेत्रदान केले. यामुळे दोघांना दृष्टी मिळणार आहे. अत्यंत अभिनंदनीय निर्णय आहे. या महान कार्याने नेत्रदान पंधरवड्याला सुरुवात झाली आहे, याचा अभिमान आहे.
- अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक