धारणी बंदला अभूतपूर्व प्रतिसाद
By Admin | Published: January 2, 2016 08:29 AM2016-01-02T08:29:48+5:302016-01-02T08:29:48+5:30
सर्व जात, धर्म विसरून शहरात शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी बंद यशस्वीरीत्या बंद पाळून नागरिकांनी इतिहास घडविला.
व्यावसायिक प्रतिष्ठाने कडकडीत बंद : सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग
धारणी : सर्व जात, धर्म विसरून शहरात शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी बंद यशस्वीरीत्या बंद पाळून नागरिकांनी इतिहास घडविला. १६ डिसेंबर रोजी तीन शाळकरी अल्पवयीन आदिवासी मुलींना अल्पसंख्यक समुदायाच्या चार युवकांनी चारचाकी वाहनात बसवून कोलकासच्या जंगलात अतिप्रसंग केल्याप्रकरणी निषेध करण्यासाठी धारणीत बंद पुकारण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून शहरातील सर्वच दुकाने कडकडीत बंद होती.
शुक्रवारी सकाळपासूनच तालुक्यातील सर्व गावांतून नागरिक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात होऊ लागले. दरम्यान सकाळपासून हॉटेल, बीअरबार, हातठेले, किराणा व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले होते. एपीएमसी यार्डात आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार केवलराम काळे, माजी आमदार राजकुमार पटेल, आयोजकांमध्ये रमेश तोटे, हिरालाल मावस्कर, श्रीपाल पाल, मोतीलाल कास्देकर आणि २७ सामाजिक संघटनेचे प्रमुख उपस्थित झाले. यात कोरकू, गोंड, भिलाला, बलई, भावसार, ब्राह्मण, गवळी, गवलान, कलाल, मुस्लिम, मराठा, बंजारी व वसाड समाजाचे जवळपास ५ हजार लोकांनी उपस्थिती दर्शविली.
दुपारी १२ वाजता काही प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर मूकमोर्चा एपीएमसी यार्डातून निघाला. हा मोर्चा बसस्थानक, पेट्रोलपंप, दयाराम चौक, हनुमान चौक, चर्च रोड, होली चौक, जयस्तंभ चौक मार्गे एसडीओ कार्यालयावर पोहोचला. यावेळी प्रभारी एसडीओ म्हणून तहसीलदार कृष्णा भामकर यांनी निवेदन स्विकारले. त्यांनी निवेदन शासनाकडे पाठविण्याचे व योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात बसस्थानक, म. ना. महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत दोन-दोन पोलिसांची ड्युटी लावण्यासह बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी केली. जेणेकरून टपोरीबाज मुले व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसविण्यास मदत होईल.
निवेदन देऊन मोर्चा परत एपीएमसी यार्डात आला. येथे अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. सुरक्षेसाठी एसडीपीओ सेवानंद तामगाडगे, ठाणेदार सुधीर पाटील, सुधाकर चव्हाण, दिनेश सोनवणे यांनी प्रयत्न केले. यावेळी तीन दंगा नियंत्रण पथकाचे व्हॅन होते. (तालुका प्रतिनिधी)