‘स्थायी-प्रशासन’ समोरासमोर
By admin | Published: June 17, 2017 12:03 AM2017-06-17T00:03:29+5:302017-06-17T00:03:29+5:30
सुमारे २५ कोटी रूपये किमतीच्या छत्री तलाव सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी पीएमसी नेमण्यावरून महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.
प्रक्रियेवर आक्षेप : छत्रीतलावाच्या पीएमसीचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सुमारे २५ कोटी रूपये किमतीच्या छत्री तलाव सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी पीएमसी नेमण्यावरून महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.
पीएमसी (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट) म्हणून आयुक्त हेमंत पवार यांनी पुण्याच्या फोर्थ डायमेंशन आर्किटेक्ट प्रा. लिमिटेडला मंजुरी दिली आहे. या संस्थेशी करारनामा करण्यास मंजुरी मिळविण्यासाठी हा विषय स्थायी समितीसमोर गेला.
‘एलफोर’ ठरली ‘एलवन’!
अमरावती : या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने पीएमसी नेमण्यासाठी पुनर्निविदा काढण्याचे आदेश देऊन फोर्थ डायमेंशनशी करारनाम्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नाकारला. स्थायी सभापती तुषार भारतीय यांच्या या पावित्र्याने प्रशासनविरूद्ध स्थायी समिती, असे चित्र निर्माण झाले आहे. फोर्थ डायमेंशन प्रा. लिमिटेडशी पीएमसी म्हणून करारनामा करण्याचा विषय स्थायीच्या बैठकीत नामंजूर केल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच फोर्थ डायमेंशनचे संचालक आ. रवि राणांद्वारे आयोजित पुणे-मुंबई दौऱ्यात सहभागी झाले होते. पुणे, लोणावळा व अहमदाबादच्या धर्तीवर छत्री तलावाचे सौंदर्यीकरणासाठी आ. राणा यांच्यासमवेत आयुक्त हेमंत पवार, प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, हे अहमदाबाद-पुणे-मुंबई येथे गेले होते. पीएमसी म्हणून स्थायीची मंजुरी मिळण्यापूर्वी फोर्थ डायमेंशनच्या या दौऱ्यातील सहभागावर खा. अडसूळ यांनी पूर्वीच आक्षेप घेतला. या कामासाठी जागतिक स्तरावर निविदा काढण्याची मागणी करीत खा.अडसूळ यांनी आ.राणा यांना आधीच आव्हान दिले. याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याच्या पार्श्वभूमिवर स्थायी समितीने ‘फोर्थ डायमेंशन’च्या नावावर मारलेली नकाराची फुली आगामी काळातील वाक्युद्धाची नांदी ठरली आहे. तांत्रिक निविदेनंतर वित्तीय लिफाफा उघडला. यात फोर्थ डायमेंशनने ३.६९, दाराशॉने २, शोभा भोपाळकर यांनी २.४० टक्के तर फोट्रेस फायनान्शियलने २.२२ टक्के दर भरलेत. यात सर्वात कमी दर भरल्याने मुंबईची दाराशॉ अॅन्ड कंपनी ‘एलवन’ ठरली. मात्र तांत्रिक बीडमध्ये एलवन ठरलेल्या फोर्थ डायमेंशनशी बोलणी करण्यात आली. ३.६० कोटी दर भरले असताना ही कंपनी १.९८ कोटी रूपयांमध्ये ‘पीएमसी’ म्हणून काम करण्यास तयार झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पीएमसीसाठी १०० कोटींचा प्रस्ताव ?
छत्रीतलावचा डीपीआर १०० कोटींचा मानून पीएमसीसाठी ३.६९ कोटी रूपये मोबदला देण्याचे ठरविले. फोर्थ डायमेंशनने तेवढेच दर भरलेत. तथापि १०० कोटींच्या डीपीआरला मान्यता नसताना ‘पीएमसी’साठी ३.६९ कोटी रूपये कसे, त्यात तडजोड होऊन हा आकडा १.९८ कोटी रूपयांवर स्थिरावला असला तरी २५ कोटींच्या प्रकल्पासाठी हा अतिशय अधिक मोबदला आहे.
असा आहे प्रशासनाचा दावा
छत्रीतलाव येथील ‘पर्यटन विकास’ कामाकरिता पीएमसी नेमण्यासाठी ४ निविदा प्राप्त झाल्यात. चारही निविदाधारकांनी उपायुक्त, अतिरिक्त शहर अभियंता, एडीटीपी, मुख्य लेखापाल,कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले. यात फोर्थ डायमेंशन प्रा.लि.ला १०० पैकी ९१.५०, दारा शॉ अॅन्ड कंपनी मुंबईला ८५.७५ रूपये, शोभा भोपाळकर पुणेला ८२ तर फोट्रेस फायनान्शियल सर्व्हिसेसला १०० पैकी ८० गुण मिळाले. फोर्थडायमेंशनला ‘एलवन’ म्हणून पसंती देण्यात आली.