पालिकेतील सिसीटिव्ही फुटेज वाढविणार आरोपींचे चेहरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:13+5:302021-08-19T04:17:13+5:30
अमरावती: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळी सभागृहात धिंगाणा घातल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी सचिन भेंडे, गणेश मारोडकर व पराग चिमोटे यांच्याविरूद्ध गुन्हे ...
अमरावती: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळी सभागृहात धिंगाणा घातल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी सचिन भेंडे, गणेश मारोडकर व पराग चिमोटे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केलेत. दरम्यान, महापालिकेने तक्रार नोंदवितेवेळी घटनाक्रमाचे सिसीटिव्ही फुटेज देखील दिले. त्या फुटेजची तपासणी करून सभागृहात शिरलेल्या गोंधळींंची ओळखपरेड घेतली जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील लिपिक विनोद निचत यांनी तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून भेंडे, मारोडकर व चिमोटेंविरूद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की, मारहाण, आरआओरड करून नारेबाजी करणे व शासनाच्या आदेशाचे उल्लंघण केल्याचा ठपका ठेऊन गुन्हे नोंदिवण्यात आले आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
१७ ऑगस्ट रोजी महापालिकेची आमसभा सरू असताना सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते व ५० ते १०० जण सभागृहात शिरले. तत्पुर्वी त्यांनी सुरक्षारक्षकांशी तथा सभागृहातील काही पदाधिकार्यांना धक्काबुक्की देखील केली. मारहाण केली. त्यामुळे सभेला उपस्थित अधिकारी, कर्मचारी व पदाधिकार्यांची सुरक्षा धोक्यात आली. अनधिकृत प्रवेशामुळे सभेत व्यत्यय निर्माण झाला, असे निचत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पालिकेला करावी लागली सुधारित तक्रार
महापालिकेचे उपायुक्त रवि पवार हे सहकारी अधिकार्यांसह तक्रार घेऊन शहर कोतवाली ठाण्यात पोहोचले होते. मात्र, कायद्याच्या चाकोरीत बसेल, गुन्हे नोंदविता येतील, अशी तक्रार द्या, अशी सुचना पोलिसांकडून करण्यात आली. त्यामुळे पवार यांच्या नेतृत्वातील अधिकार्यांचे शिष्टमंडळ माघारी परतले. सुधारणा करून उपायुक्तांऐवजी निचत नामक लिपिकाला फिर्याद नोंदविण्यासाठी पाठविण्यात आले. फिर्यादी कुणी व्हावे, हे ठरविण्यातच एक ते दोन तास गेलेत. अखेर ७.३० च्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला.
कोट
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तिघांना पकडण्यासाठी मंगळवारी रात्रीच पथक पाठविले होते. तिघांचाही कसून शोध सुरू आहे. त्यांची अटक व सिसिटिव्ही फुटेजच्या तपासणीनंतर आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राहूल आठवले,
ठाणेदार, शहर कोतवाली