रवी राणांच्या प्रचारसभेत फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:30 IST2024-11-26T13:30:01+5:302024-11-26T13:30:54+5:30
Amravati : महाविकास आघाडी भुईसपाट करण्याची स्वप्नपूर्ती

Fadnavis' 'that' words came true in Ravi Rana's campaign rally
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महायुतीतून युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेराचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ नोव्हेंबर रोजी येथील गोपालनगर टी पॉइंटवर प्रचार सभा घेतली होती. या सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट रवी राणांच्या 'पाना'ने कसायचे आहेत, अशी बोचरी टीका केली होती. अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर फडणवीसांनी राज्यातून महाविकास आघाडी भुईसपाट करण्याची स्वप्नपूर्ती बघितली होती, ती पूर्ण झाली. म्हणून रवी राणांच्या प्रचार सभेतील फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले, आता याविषयी जोरदार चर्चा रंगत आहे.
बडनेराचे आमदार रवी राणा हे भाजपचे मित्रपक्ष असून त्यांची विकासात्मक कामे फार मोठी आहेत. खरे तर त्यांना मतदारसंघात प्रचार करण्याची गरजच नाही. कारण त्यांचे निवडणूक चिन्ह 'पाना' आहे, याच पान्याने येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. भाजपच्या कोट्यातून बडनेराची जागा रवी राणा यांना देण्यात आली असून त्यांचे बोधचिन्ह पाना आहे. ते कोणाकोणाचे नट कसतील माहीत नाही. पण आम्हालादेखील विरोधकांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत, त्यासाठी तुमच्या पान्याची आवश्यकता पडेल, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडीला 'जोर का धक्का घिरे से' अशीच धोबीपछाड दिली आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या प्रचार सभेत काढलेले शब्द खरे ठरल्याने 'ती' सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या 'लकी' ठरली, यात दुमत नाही.
रवी राणांचा विजयाचा चौकार अन् इतिहास नोंदविला
बडनेरा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात आमदार रवी राणा यांच्या 'किराणाची धूम पाहावयास मिळाली. त्यातच लाडक्या बहिणींचे मतदान बोनस ठरले. रवी राणा हे राजकारणातील अजब रसायन असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. राणांनी आपला विजय हा भगव्या-निळ्या वादळाचा असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. बडनेरा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून राजकीय ताकद उभी करणारे एकमेव ते आमदार ठरले आहेत. त्यामुळे नव्या महायुती सरकारमध्ये रवी राणांना मंत्रिपदाची संधी हमखास मानली जात आहे.