फईमोद्दीन काझीच्या मारेकऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:24+5:302021-09-23T04:15:24+5:30
अमरावती : वलगाव मार्गावरील अबू बकर कॉलनीतील फईमोद्दीन नसरोद्दीन काझी (२१) या युवकाच्या हत्येप्रकरणी फरार असलेला सद्दाम याला स्थानिक ...
अमरावती : वलगाव मार्गावरील अबू बकर कॉलनीतील फईमोद्दीन नसरोद्दीन काझी (२१) या युवकाच्या हत्येप्रकरणी फरार असलेला सद्दाम याला स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली.
पोलीस सूत्रांनुसार, फईमोद्दीनचा मृतदेह ३ सप्टेंबर रोजी शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुसलानजीक एका तलावात आढळला होता. या प्रकरणात शेंदूरजनाघाट पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदविला. फईमोद्दीन हा तंत्र-मंत्र, हकीमाचे काम करीत होता. त्यामुळे त्याचे राज्याबाहेरील लोकांशीही संबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतलेल्या नवाज खान नूर खान (३२, रा. अमरावती) याने सद्दामचा उल्लेख केला होता. फईमोद्दीन हा सद्दामच्या घरी प्रयागराजलादेखील गेला होता. त्याच्यामुळे त्याला अलीकडेच झालेल्या मुलाची प्रकृती ठीक राहत नसल्याच्या संशयाने त्याला पछाडले होते. त्यामुळे त्याने यूपी ७० डीडब्ल्यू ६५७७ क्रमांकाच्या वाहनाने त्याने अमरावती गाठले. नवाजने फईमोद्दीनला त्याच्या ताब्यात दिले. वाहनातच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला व प्रेत तलावात फेकून दिले. नवाजच्या या कबुलीनंतर पोलिसांनी सद्दामला ताब्यात घेण्यासाठी चमू उत्तर प्रदेशला रवाना केली. अखेर २२ सप्टेंबर रोजी त्याला अमरावतीत आणण्यात आले. आरोपीला शेंदूरजनाघाट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मोर्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर व राजेंद्र टेकाडे आणि स्थानिक गुन्हे शाखा व शेंदूरजनाघाट पोलिसांनी ही कामगिरी केली.