एचडीएफसी होम फायनान्सची १.८६ कोटींची फसवणूक; हप्ते थकल्याने उघडकीस आला प्रकार

By प्रदीप भाकरे | Published: September 17, 2022 04:38 PM2022-09-17T16:38:11+5:302022-09-17T16:39:56+5:30

गृहकर्जाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे दिली

Fake documents for home loan, 1.86 crore fraud of HDFC Home Finance | एचडीएफसी होम फायनान्सची १.८६ कोटींची फसवणूक; हप्ते थकल्याने उघडकीस आला प्रकार

एचडीएफसी होम फायनान्सची १.८६ कोटींची फसवणूक; हप्ते थकल्याने उघडकीस आला प्रकार

Next

अमरावती : गृहकर्ज मिळविण्यासाठी बनावट दस्तावेज देत सात जणांनी एचडीएफसी होम फायनान्सला तब्बल १ कोटी ८६ लाख रुपयांचा चुना लावला. कर्जाचे काही हप्ते थकल्याने हा प्रकार उघड झाला.

गृहकर्ज मिळविण्यासाठी आरोपींनी ते वरिष्ट लिपिक, सहायक शिक्षक, ऑपरेशन मॅनेजर असल्याची बतावणी करून तेथे नौकरीवर असल्याबाबतची वेतन पावती, आयकरचा १६ नंबरबा फॉर्म, ओळखपत्र असे सारे प्रमाणपत्र दिले. याप्रकरणी एचडीएफसी लिमिटेडचे संदीप अंबुलकर यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी त्या सात जणांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

आरोपींमध्ये रंजित राऊत (४३, रहाटगाव), निलेश वानखडे (३५, शेगाव रोड, अमरावती), अंकुश राऊत (२५, भाजीबाजार, अमरावती), विपुल बगाडे (२६, रा. अकोली रोड, अमरावती), राजु कोलटेके (४५, रा. कोलटेक, भातकुुली), विकास कडू (२९, थुगाव, अमरावती) व अजय बोज्जे (४६, फ्रेजरपुरा, अमरावती) यांचा समावेश आहे. सातही आरोपींनी बनावट कागदपत्रे बनवून ते खरे आहेत, असे भासविले व एचडीएफसी या गृहनिर्माण वित्तीय संस्थेची १ कोटी ८६ लाख ४४ हजार ४९६ रुपयांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

असा झाला प्रकार उघड 

सातही आरोपींनी गृहकर्ज घेतले. मात्र काही हप्ते भरल्यानंतर त्यांनी भरणा बंद केल्याने एचडीएफसी व्यवस्थापनाकडून चौकशीला सुरूवात झाली. त्या सात जणांनी ज्या शैक्षणिक संस्था, विदर्भ पाटबंधारे विभाग, स्त्रीधन कॉटनस्पिनमध्ये ते नोकरीला असल्याची कागदपत्रे दिली होती, त्या सर्व संस्थेशी संपर्क साधला असता, ते सातही जण त्या संबंधित संस्थेत नोकरीस नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेले दस्तावेज देखील बनावट बनविल्याचे लक्षात आले. १ सप्टेंबर २०२१ ते १६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान हा गैरव्यवहार झाला.

Web Title: Fake documents for home loan, 1.86 crore fraud of HDFC Home Finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.