कुरिअरने बनावट नोटांची ‘एन्ट्री’
By admin | Published: November 4, 2015 12:08 AM2015-11-04T00:08:27+5:302015-11-04T00:08:27+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी उलथापालथ अपेक्षित असते. ही संधी साधून भारतीय चलनाच्या बनावट नोटा व्यवहारात आणल्या जात आहेत.
पोलीस अनभिज्ञ : बांगला देशातून कोलकाता-मुंबईमार्गे येत असल्याचा संशय
गणेश वासनिक अमरावती
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी उलथापालथ अपेक्षित असते. ही संधी साधून भारतीय चलनाच्या बनावट नोटा व्यवहारात आणल्या जात आहेत. कुरिअर सेवेच्या माध्यमातून या बनावट नोटांची शहरात ‘एन्ट्री’ होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
बांगलादेशातून भारतीय चलनाच्या बनावट नोटा अमरावतीच्या बाजारपेठेत पोहोचल्या आहेत. कुरिअर सेवेच्या माध्यमातून या बनावट नोटा आणल्या गेल्या आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या भारतीय चलनाच्या छापिल नोटा असल्याची माहिती आहे. कुरिअरमधून ‘गिफ्ट’च्या रूपात बनावट नोटांचे हे पार्सल आणले जात आहे. विशेषत: मुंबईतून सर्वाधिक बनावट नोटा अमरावतीत येत आहेत. कुरिअर सेवेतील प्रसिध्द नाव असलेल्या येथील ‘आंगडिया सर्व्हिस’च्या माध्यमातून भारतीय चलनाच्या बनावट नोटा शहरात येत आहेत. इतकेच नव्हे तर सोने, चांदी व हवालाची रक्कमही अलिकडे मोठ्या प्रमाणात शहरात दाखल होत आहे. पोलीस प्रशासनाच्या नजरेत ‘कुरिअर सेवे’ ची एक क्षुल्लक व्यवसाय अशी नोंद असली तरी या सेवेच्या माध्यमातून भारतीय चलन खिळखिळे करण्याची जोरदार सुरु झाली आहे. मुंबई येथून भारतीय बनावट चलनाच्या नोटा ‘एसके’ नामक व्यक्ती पाठवीत असल्याची गोपनीय माहिती आहे.
या व्यवहारातून क्षणात श्रीमंत होण्यास इच्छुक काही विशेष युवकांची फळी तयार करण्यात आली आहे. हे युवक आठवड्यातून दोन ते तीन वेळा मुंबईला जावून बनावट नोटांचे ‘डिलिंग’ करीत असल्याचे समजते. वर्दळीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रतिष्ठानांमध्ये बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत. कुरिअर सेवेतून बनावट नोटांचे पार्सल येत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या ध्यानी-मनीही नाही. यापूर्वी जकात अथवा एलबीटी सरू असताना कुरिअरद्वारे येणारे गिफ्ट पॅक, पार्सल, लिफाफे तपासले जायचे. मात्र, आता कोणतीही करप्रणाली सुरु नसल्याने कुरिअर सेवा पोलिसांच्या नजरेतून मुक्त झाली आहे.
कुरिअर सेवेच्या नावाखाली नेमके काय सुरू आहे?, हे पोलीस प्रशासनातील अधिकारीदेखील जाणून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. शहरातील कुरिअर सेवेच्या मुक्त कारभाराच्या माध्यमातून आता बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा घाट रचला जात असल्याची ही बाब धक्कादायक आहे. (प्रतिनिधी)
सहा हजारांच्या मोबदल्यात बनावट १० हजार !
भारतीय चलनाच्या बनावट नोटा मुंबई येथील ‘एसके’ नामक व्यक्ती पुरवीत असल्याची माहिती आहे. सहा हजारांच्या मोबदल्यात तो बनावट १० हजार रुपयांचा नोटा उपलब्ध करून देतो. या बनावट नोटा स्वत: बाळगणे अथवा रेल्वेने आणणे धोकादायक असल्यामुळे कुरिअर सेवेच्या सुरक्षित (?) मार्गाचा अवलंब केला जात आहे. कुरिअरमधून नोटांचे पार्सल वेगळ्या नावाने शहरात येत आहे.
कारवाईच्या भीतीने दुकानदारांची लपवाछपवी
बाजारपेठेत दुकानदारांना बनावट नोटा आढळल्या तरी त्या कारवाईच्या भीतीने लपविल्या जातात. किंबहुना या बनावट नोटा फाडून नामशेष करण्यासही व्यापारी मागेपुढे पाहत नाही. ज्या दुकानदारांकडे बनावट नोट आढळली की त्याच दुकानदाराची उलट तपासणी घेतली जाते. त्यामुळे कायदेशीर कारवाईच्या भानगडीत पडण्याऐवजी ५०० ते १००० रुपयांचे नुकसान सहन करण्याची त्यांची तयारी असते. नेमकी हीच बाब हेरून हल्ली बाजारात बनावट नोटांचे चलन वाढीस लागले आहे.
बनावट नोटा तपासण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेत अद्ययावत ‘नोट काऊंटिंग मशीन’ आहे. बनावट नोट आढळल्यास ही मशीन आपोआप थांबते. मशिनद्वारे विशेषत: ५०० व १००० रुपयांची नोट तपासली जाते. बनावट नोटा आढळल्याचे प्रकरण अद्याप उघडकीस आले नाही.
- एम.आर. काबरा, झोनल मॅनेजर, बँक आॅफ महाराष्ट्र.
बनावट नोटा आढळल्याचे प्रकरण निदर्शनास आले नाही. किंबहुना तशी तक्रारदेखील नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. बनावट नोटा येत असल्याबाबत कु रिअर केंद्राची तपासणी केली जाईल.
- प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, अमरावती.