बनावट कीटकनाशकाचा नऊ लाखांचा साठा जप्त
By admin | Published: August 23, 2015 12:28 AM2015-08-23T00:28:27+5:302015-08-23T00:28:27+5:30
येथील एमआयडीसीमधील एका प्रतिष्ठानात बनावट कीटकनाशकांची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून ९ लाखांचा साठा जप्त केला.
कृषी विभागाची धाड : एमआयडीसीतील 'अरुणा केमिकल्स'मधून विक्री
अमरावती : येथील एमआयडीसीमधील एका प्रतिष्ठानात बनावट कीटकनाशकांची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून ९ लाखांचा साठा जप्त केला. याप्रकरणी राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील एमआयडीसीमधील 'अरुणा केमिकल्स'मध्ये एका कंपनीच्या ‘ईमामॅसीन बेंझोट’ या नावाने बनावट कीटकनाशकाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली. बाजारात ६ ते ७ हजार रुपये किलो किमतीचे हीे कीटनाशके २ ते अडीच हजार रुपये किमतीने विकली जात होती. या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून कृषी विभागाने पडताळणी केली व शुक्रवारी दुपारी छापा मारला. प्लास्टीकच्या ड्रममध्ये हा बनावट कीटकनाशकाचा विनापरवाना व ९ लाखाचा साठा जप्त केला. या कीटकनाशकाची साध्या प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये विक्री केली जायची. हे प्रतिष्ठान निखिल सोनी यांचे असून ते स्वत: उपस्थित होते, अशी माहिती कृषी विभागाने दिली. विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांचे मार्गदर्शनात छापा मारण्यात आला.