मध्यप्रदेशातील बनावट दारूचा विदर्भात विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 04:50 PM2017-07-02T16:50:08+5:302017-07-02T16:50:08+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील सर्व प्रकारच्या दारूविक्रीवर बंदी घातल्यानंतर मध्यप्रदेशातील बनावट दारूने विदर्भाला विळखा घातला आहे.

The fake liquor of Madhya Pradesh is found in Vidarbha | मध्यप्रदेशातील बनावट दारूचा विदर्भात विळखा

मध्यप्रदेशातील बनावट दारूचा विदर्भात विळखा

Next

गणेश वासनिक ।

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील सर्व प्रकारच्या दारूविक्रीवर बंदी घातल्यानंतर मध्यप्रदेशातील बनावट दारूने विदर्भाला विळखा घातला आहे. ही बनावट दारूविक्री रोखणे राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात निम्म्यापेक्षा अधिक दारु दुकानांना टाळे लावले आहे. यात बहुतांश दारूविक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन दारुबंदीबाबतच्या पुनर्विचारासाठी याचिका दाखल केली आहे. यायाचिकांवर अद्यापही सुनावणी झाली नाही. मात्र, अवैध दारुविक्रेत्यांनी चक्क मध्यप्रदेशातील बनावट दारुविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे थाटला आहे. मध्यप्रदेशातून अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात सहजतेने बनावट ब्राण्डेड विदेशी दारु आणून विकली जात आहे. तसेही वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्याने मध्यप्रदेशातील दारुविक्रेत्यांनी वर्धेला लक्ष्य केले आहे. मध्यप्रदेशातून बनावट दारूची वाहतूक करुन ती नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वर्धा, अमरावती जिल्ह्यात पुरवली जाते. पोलीस, एक्साईजच्या आशीर्वादाशिवाय ते शक्य नाही, ही बाब सर्वश्रुत आहे. हल्ली विदर्भात राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉटेल-ढाब्यांवर मध्यप्रदेशातील बनावट दारु विकली जात आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लागू झालेल्या दारूबंदीमुळे मद्यपींना दारु कोणतीही असो ती हवीच, याप्रमाणे मध्यप्रदेशातील बनावट दारूची चव देखील आता त्यांना ब्रॅण्डेड विदेशी दारुप्रमाणे वाटू लागल्याचे बोलले जात आहे. नागपुरातही बहुतांश दारुविक्रेत्यांकडे मध्यप्रदेशातील बनावट दारु विकली जात असून ती चढ्या दराने विकण्याचा व्यवसाय सुरु आहे. मध्यप्रदेशातील बनावट दारूचा नियमबाह्य व्यवसाय करण्यासाठी अमरावती, वर्धा, नागपूर व अकोला जिल्ह्याच्या सीमेवर अनेकांनी शेतात गोदाम बनविले आहे. चोरट्या मार्गाने बनावट दारूची वाहतूक करून ती गोदामात साठवून ठेवली जाते. अकोला आणि यवतमाळ येथे विदेशी दारुविक्रीचे ठोक विक्रेते असून मध्यप्रदेशातील बनावट दारूच्या बाटलीवर प्लास्टिकचे स्टिकर काढून ही दारु अधिकृत एजन्सीच्या माध्यमातून विदर्भातील हॉटेल, ढाबे, बियरबार, वाईन शॉपवर पोहोचविली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. कमी दरात आणली जात असलेली मध्यप्रदेशातील बनावट दारु ही चढ्या दरात विकली जात आहे. मध्यप्रदेशातील बनावट दारु व्यवसायाची विदर्भात साखळी असून राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन देखील यात सहभागी असल्याचे वास्तव आहे.

राज्य शासनाचा महसूल बुडित

विदर्भात चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशात निर्मित बनावट दारु विकली जात असल्याने राज्य शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. ब्रॅण्डेड विदेशी कंपन्यांच्या दारु बाटली पॅकिंगलाही लाजेवल, अशी मध्यप्रदेशातील बनावट दारु बाटल्यांची पॅकिंग आहे. दारुच्या बाटलीवर प्लास्टिकचे स्टिकर हे मध्यप्रदेशातील बनावट दारुची ओळख आहे. ह्यओन्ली सेल फॉर एमपीह्ण असे बाटलीवर लिहिले असते.

अमरावतीत जूनमध्ये साडेतीन लाखांची बनावट दारु पकडली

मध्यप्रदेशातून बनावट दारूची अमरावती जिल्ह्यात वाहतूक होत असताना एकट्या जून महिन्यात साडेतीन लाखांची दारु पकडण्यात आली आहे. अचलपूर, पांढुर्ण्यातून बनावट दारु जप्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. चार जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील बनावट दारु सीमेवरुन आणताना सतत कारवाई केली जाते. त्याकरिता स्वतंत्र भरारी पथक आहे. मात्र, अलिकडे बनावट दारूविक्रीमध्ये अनेकांनी उड्या घेतल्याचे स्पष्ट होते. तोकड्या मनुष्यबळामुळे बनावट दारूविक्रीवर अंकुश आणणे कठीण आहे.

- प्रमोद सोनोने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अमरावती.

Web Title: The fake liquor of Madhya Pradesh is found in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.