गोंडवाना विद्यापीठात प्राचार्य, शिक्षकांच्या कागदपत्रांचे ‘व्हेरिफिकेशन’; मग अमरावतीत का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:40 AM2023-11-27T11:40:40+5:302023-11-27T11:41:29+5:30
बनावट नेट - सेटप्रकरण गाजतेय; बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले
गणेश वासनिक
अमरावती : राज्यात बनावट नेट - सेट प्रमाणपत्रांचे प्रकरण गाजत असताना गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने प्राचार्य, शिक्षकांच्या कागदपत्रांचे ‘व्हेरिफिकेशन’ करावे, असे परिपत्रक जारी केले आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने अद्याप बनावट नेट - सेट प्रकरणाची दखल घेतली नसल्याचे चित्र आहे.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने वाशिम जिल्ह्याच्या कामरगाव येथील कला, विज्ञान महाविद्यालयाचे सहयाेगी प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २००४मध्ये मिळविलेले राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) प्रमाणपत्र फेक असल्याचे जाहीर केले आहे. या गंभीरप्रकरणी सुरेंद्र चव्हाण यांच्यावर फौजदारी दाखल होणार आहे. तसेच अमरावती पोलिस आयुक्तांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे एकूण ३३ जणांचे नेट - सेट प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार आहे. त्यापैकी पोलिसांनी १९ प्राध्यापकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी विद्यापीठाकडे नावे पाठविली आहेत. पण, कुलसचिववगळता अमरावती विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरूंचा कारभार प्रभारी सुरू आहे. बनावट नेट - सेटप्रकरण हे अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात उघडकीस आले आहे. तरीही अमरावती विद्यापीठाकडून या प्रकरणाचा ‘मास्टर माइंड’ शोधण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याने शंका-कुशंका वर्तविल्या जात आहेत.
प्राचार्य, शिक्षकांचे प्रस्ताव बंधपत्रात करावे लागतील सादर
गोंडवाना विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेत झालेल्या निर्णयानुसार नवनियुक्त प्राचार्य, शिक्षकांचे प्रस्ताव बंधपत्रात सादर करावे लागतील, असे परिपत्रक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जारी केले आहे. महाविद्यालयांनी नवनियुक्त प्राचार्य, शिक्षकांची मान्यता घेतल्यानंतरच रूजू करून घ्यावे. तसेच न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास संबंधित संस्थेचे अध्यक्ष, सचिव जबाबदार राहतील. या आशयाचे बंधपत्र शंभर रुपयांच्या मुद्रांकावर प्रस्तावासोबत सादर करणे अनिवार्य असल्याचे गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलसचिव देवेंद्र झाडे यांनी परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
तक्रारीनुसार एकूण ३३ प्राध्यापक, सहयाेगी प्राध्यापकांचे नेट - सेट मूळ प्रमाणपत्र महाविद्यालयांकडून मागविले आहे. यात काहींचे व्हेरिफेकेशन झाल्याची माहिती आहे. मात्र, कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच नेट-सेट प्रमाणपत्र खरे की खोटे? ही बाब नंतर स्पष्ट होईल.
- डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ.