आम्ही डीबी कर्मचारी, एवढ्या रात्री कुठं फिरतायं? म्हणत तोतयेगिरी

By प्रदीप भाकरे | Published: October 14, 2023 01:50 PM2023-10-14T13:50:58+5:302023-10-14T13:53:35+5:30

खऱ्या पोलिसांकडून जेरबंद : चित्रा चौकातील प्रकार

fake police whom looting locals caught by the Real Police | आम्ही डीबी कर्मचारी, एवढ्या रात्री कुठं फिरतायं? म्हणत तोतयेगिरी

आम्ही डीबी कर्मचारी, एवढ्या रात्री कुठं फिरतायं? म्हणत तोतयेगिरी

अमरावती : एवढ्या रात्री कुठे फिरताय, कार्यवाही करावी लागेल, असा दम भरणाऱ्या दोन तोतया पोलिसांना खऱ्या पोलिसांमुळे कोठडीची हवा खावी लागली. १३ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० च्या सुमारास चित्रा चौकात ही घटना घडली. याप्रकरणी चिराग बगडाई (२२, मोतीनगर) याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी गणेश दामोदर लांजेवार (३५) व क्रिष्णा खत्री (३६, दोघेही रा. बॉम्बे फैल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

फिर्यादी चिराग हा एका वृत्तवाहिनीत कार्यरत आहे. १३ ऑक्टोबर पहाटे २.३० च्या सुमारास तो त्याच्या मित्रासह जेवण करून दुचाकीने चित्रा चौक येथे आले. त्यावेळी दोन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले. आम्ही गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डि बी पथकाचे कर्मचारी आहोत, असे सांगुन तुम्ही येथे काय करत आहात व कशासाठी आलात, अशी विचारणा करून त्या दोन तोतयांनी चिरागकडील मोबाइल घेतला. पत्रकार आहो, असे सांगितल्यावर त्यांनी मोबाईल परत केला. मात्र, एवढ्या रात्री का फिरत आहात, तुमच्यावर कार्यवाही करावी लागेल, अशी धमकी दिली. तितक्यातच रात्रीचे गस्त घालणारे खरे पोलिस तेथे आले.

शहर कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात

खऱ्या पोलिसांना चिरागने संपुर्ण प्रकार सांगितला. त्यामुळे पोलिसांनी त्या दोन्ही तोतयांना ताब्यात घेतले. त्यावेळी दोघांनी आपली ओळख सांगितली. त्यानंतर गणेश व क्रिष्णा या दोन्ही तोतया पोलिसांना शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चिराग बगडाई याच्या तक्रारीनुसार, त्या दोघांविरूद्ध तोतया पोलीस असल्याची बतावणी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: fake police whom looting locals caught by the Real Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.