आदिवासी विभागाच्या नावाने बनावट नोकरभरती; सायबर ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:10 PM2020-02-22T12:10:37+5:302020-02-22T12:11:02+5:30
आदिवासी विकास विभागाच्या नावाने नोकरभरतीची बनावट जाहिरात व्हायरल झाली असून, उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या नावाने नोकरभरतीची बनावट जाहिरात व्हायरल झाली असून, उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत आदिवासी विभाग प्रशासनाने सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दोन दिवसांपासून व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवर आदिवासी विकास विभागात नोकरभरती असल्याची बनावट जाहिरात व्हायरल होत आहे. ‘आदिवासी विकास विभाग आयुक्तालय’च्या नावाने ही जाहिरात व्हायरल होत आहे. मात्र, व्हायरल झालेली पोस्ट आणि लिंक हे बनावट असल्याचे समोर आले आहे. ही वेबसाइट आणि त्यातील मजकूर हा आदिवासी विकास आयुक्तालयाच्या मूळ वेबसाइटप्रमाणे तयार करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला ही वेबसाइट खरी आहे की खोटी, हे कळणार नाही.
३ हजार १९९ जागांसाठी नोकरभरतीचा उल्लेख या फेक वेबसाइटवर करण्यात आला आहे. सिव्हिल इंजिनीअर, इलेक्ट्रिक इंजिनीअर, सिव्हिल इंजिनीअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा सहा विभागांमध्ये भरतीची जाहिरात काढण्यात आल्याचे यात दर्शविले आहे. मुंबईत १०३१, पुण्यात ८६६, नाशिकमध्ये ७२४, जळगावात ५७८ अशी जिल्हानिहाय पदे प्रसिद्ध करुन ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. खुल्या प्रवर्गाला ५०० रुपये तर, इतरांसाठी ३५० रुपये शुल्क ऑनलाइन मागविण्यात आले असून, यात बेरोजगार तरूणांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, वेबसाइट तपासणीसाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
कोणीतरी हे कृत्य खोडसाळपणे, गैरहेतुने केले आहे. आदिवासी विभागाची बदनामी करण्याच्या दृष्टीने अशी खोटी जाहिरात प्रसिद्ध केली. याबाबत पोलिसांच्या सायबर ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.