बनावट कातडी प्रकरणाला वेगळे वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:45 PM2018-03-05T22:45:26+5:302018-03-05T22:45:26+5:30
वाघाची बनावट आणि बिबट्याची कातडी पकडून स्वत:चे हसे करून घेतलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठांनी खोटे दस्तावेज बनविण्यासाठी दबाव आणल्यामुळे अमरावती वनविभाग विरूद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ वनाधिकारी असे शीतयुद्ध रंगले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वाघाची बनावट आणि बिबट्याची कातडी पकडून स्वत:चे हसे करून घेतलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठांनी खोटे दस्तावेज बनविण्यासाठी दबाव आणल्यामुळे अमरावती वनविभाग विरूद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ वनाधिकारी असे शीतयुद्ध रंगले आहे. बनावट कातडीची लेखी तक्रार वनविभागाच्या प्रधान सचिवांकडे दस्तुरखुद्द वनाधिकाऱ्यांनीच केली आहे. त्यामुळे वनविभाग विरुद्ध व्याघ्र प्रकल्प हा वाद उफाळून आला आहे.
राज्याचे वनसचिव विकास खारगे यांच्या नावे पाठविलेल्या तक्रारीत अमरावती वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्राधिकारी यांनी सामूहिकपणे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांच्याविरूद्ध एल्गार पुकारला.
विभागीय वनाधिकारी (व्याघ्र क्राइम सेल) विशाल माळी यांनी ४ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातून वाघ व बिबट्याची कातडी जप्त केली. यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, सदर कातडी ही बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावर माळी यांनी सर्व प्रकरण अमरावती वनविभागावर लोटले. यातील एका आरोपीची मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला फरार दाखविण्याची किमया झाली. या प्रकरणाला ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर हे प्रकरण थंड करण्यासाठी २१ फेब्रुवारीला उपवनसंरक्षक मिणा हे तपास अधिकारी आर.जी. बोंडे व इतर वनाधिकाºयांना क्षेत्रसंचालक रेड्डी यांच्याकडे घेऊन गेले.
भ्रमणध्वनी रेकॉर्ड तपासावे
पंचनामा बदलून आरोपी एकच दाखवा असे एम. एस. रेड्डी यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. बनावट वाघ, बिबट कातडी पकडून नवख्या विभागीय वनाधिकाºयाने पाठ थोपटून घेण्याचा प्रकार झाला. मात्र, याप्रकरणी दोन आरोपी असताना पंचनामा बदलविण्यास दबाव आणल्याने व धमकी दिल्याने अमरावती वन विभागातील दोन सहायक वनसंरक्षक व अर्धा डझन वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी सही शिक्क्यानिशी वनसचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अलीकडेच टुरिझमच्या नावाखाली झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी, तसेच वनाधिकारी विशाल माळी हे गुन्ह्याच्या तपासापासून कोणत्या वरिष्ठांच्या संपर्कात होते, त्यांचे भ्रमणध्वनी रेकॉर्ड बाहेर काढावे आणि वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी अशी बनावट कारवाई करण्यास मुभा दिली का? हे चौकशीतून पुढे आणावे, असे लेखी तक्रारीत नमूद आहे.
एनजीओमार्फत मध्यस्थी?
बनावट कातडी प्रकरणात दुसऱ्या आरोपीला वाचविण्यासाठी सोबतच्या एन.जी.ओ.ने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अमरावती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी खुली लेखी तक्रार क्षेत्रसंचालकांविरूद्ध करीत असताना उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे वनविभागाच्या तपासकर्त्या वनाधिकाऱ्यांना सहकार्य करीत नसल्याची भावना अधिकाºयांमध्ये निर्माण झाली आहे. कारण रेड्डी यांनी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांना डीएफओ मिणा यांच्यासमोरच बनावट कातडीच्या तपास प्रकरणाला कलाटणी देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
क्राईम सेल अज्ञानी!
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने लाखो रुपये खर्चून क्राइम सेल गठित केले. अननुभवी वनाधिकाऱ्याची नियुक्ती केली. सोबतीला मानधनावर काही एन.जी.ओ. दिले. मात्र, पोलीस खात्याच्या तुलनेत ‘व्याघ्र क्राइम सेल’ अज्ञानी आहे. बनावट कातडीची ओळख नसलेल्या वनाधिकाºयांचा यात हशा उडाला आहे. त्यात आरोपी दोन असताना एकालाच आरोपी करण्याची धडपड सुरू झाली आहे.
बिबट, वाघ कातडी जप्तीप्रकरणी पंचनामा योग्य नाही. मारेकरी समोर यायला हवे. यात चौकशी अधिकारी चौकशी करण्यास असमर्थ असल्यास त्यांनी तसे लेखी द्यावे. याप्रकरणी कुणावरही दबाव आणलेला नसून, वैयक्तिक संपत्तीच्या चौकशीचे आरोप तथ्यहीन आहेत.
- एम.एस. रेड्डी
क्षेत्रसंचालक, मेळघाट