भाजीपाल्याच्या भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:41 PM2018-04-17T23:41:25+5:302018-04-17T23:41:36+5:30
भाजीबाजारात विविध प्रकारच्या भाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, भाव गडगडले आहेत. किरकोळ विक्रेत्यांचीसुद्धा हीच स्थिती असून, टोमॅटोला चांगला भाव नसल्यामुळे त्यांचा खप व्हावा म्हणून गाडगेनगर येथील किरकोळ विक्रत्यांनी त्यासोबत ‘वांगी फ्री’चे फलकच लावले आहेत.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाजीबाजारात विविध प्रकारच्या भाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, भाव गडगडले आहेत. किरकोळ विक्रेत्यांचीसुद्धा हीच स्थिती असून, टोमॅटोला चांगला भाव नसल्यामुळे त्यांचा खप व्हावा म्हणून गाडगेनगर येथील किरकोळ विक्रत्यांनी त्यासोबत ‘वांगी फ्री’चे फलकच लावले आहेत. भाव कमी असूनही ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्याने उत्पादकांवर काय परिस्थिती ओढवली असेल, याचा अंदाज यातून येऊ शकतो.
नाशिक व ग्रामीण भागातून येणाऱ्या पांढºया कांद्याने शेतकºयांच्या डोळ्यांत पाणी आणले. कांद्याला सोमवारी कमीत कमी ४०० व जास्तीत जास्त ७०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. याची आवक ४२५ क्विंटल ऐवढी होती. लाला कांदा ४०० ते ७०० रुपये, आवक २१० क्विंटल, तर पांढरे बटाटे १२०० ते १६०० रुपये क्विंटलने विकले गेले. याची आवक ४५५ क्विंटल होती. लाल बटाट्याला १२०० ते १७०० रुपये भाव मिळाला. आवक १२० क्विंटल होती. टोमॅटोला फारच कवडीमोल भाव मिळत आहे. बाजारपेठेत मंगळवारी ५०० ते ६०० रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. याची आवक ६५ क्विंटल एवढी होती. वांगी ६०० ते ७०० रुपये दराने होती. आवक फक्त २० क्विंटल होती. फूलकोबीला २२०० ते २४०० रुपये दर भाव मिळाला. आवक मात्र १५ क्विंटलच होती. उन्हाळ्यात भाज्या जास्त काळ टिकत नसल्याने मिळेल त्या भावाने विक्री करीत आहेत. टोमॅटोला भाव न मिळाल्याने त्यासोबत वांगी मोफत विक्रीची शक्कल लढविली आहे.