खोटी माहिती अंगलट, ६० शिक्षकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:40 PM2018-07-02T23:40:46+5:302018-07-02T23:41:16+5:30
आॅनलाइन बदली प्रक्रियेने अगोदरच हैराण झालेल्या शिक्षकांना आता खोटी माहिती भरल्याचे प्रकरण अंगलट आले आहे. बदलीच्या पोर्टलमध्ये खोटी माहिती भरणाऱ्या ६० शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आॅनलाइन बदली प्रक्रियेने अगोदरच हैराण झालेल्या शिक्षकांना आता खोटी माहिती भरल्याचे प्रकरण अंगलट आले आहे. बदलीच्या पोर्टलमध्ये खोटी माहिती भरणाऱ्या ६० शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. यावर्षी शासनाने प्रथमच राज्यातील सर्व शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने केल्या. सुरुवातीला या प्रक्रियेला विरोध झाला. मात्र, विरोधाला न जुमानता शासनाने ही प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेमुळे बदलीचे ठिकाण आदेश हातात मिळेपर्यंत कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे बदलीची आॅर्डर घेण्यासाठी जाताना शिक्षकांच्या काळजात धस्स झाले होते. यात कोणाची सोय झाली, तर कोणाची गैरसोय झाली. बºयाच शिक्षकांना आदेश मिळाले आहेत. आता बदली प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये पोर्टलवर खोटी माहिती भरणाºयांवर कारवाईस सुरुवात झाली आहे. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या, त्यात काहींनी अंतर खोटे दाखविले, तर काहींनी बोगस प्रमाणपत्र जोडल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. अशा शिक्षकांचा चौकशी अहवाल व प्राप्त तक्रारीवरू न केलेल्या पडताळणीअंती जिल्ह्यातील ६० शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशावरून शिक्षण विभागाने नोटीस बजावल्या. प्रशासन त्यांच्यावर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सुनावणी
बोगस प्रमाणपत्र जोडणाºया संबंधित शिक्षकांना शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाºयांमार्फत नोटीस बजावल्या. या सर्व शिक्षकांची सुनावणी ३ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी या जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी १० पासून घेणार आहेत.
शिक्षक संख्या
शिक्षण विभागाने नोटीस बजाविलेल्या तालुकानिहाय शिक्षक संख्या पुढील प्रमाणे आहे. मोर्शी ५, चांदूरबाजार ६, चिखलदरा २, तिवसा ४, दर्यापूर ४, धामणगाव रेल्वे १, धारणी ४, अमरावती ८, अचलपूर १०, वरूड २, भातकुली ४ आणि नांदगाव खंडेश्वर ९ याप्रमाणे शिक्षकांचा समावेश आहे.
खोटी माहिती देऊन संवर्ग १ व २ मध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या ६० शिक्षकांची सुनावणी ३ जुलै रोजी सीईओ यांच्यासमोर होत आहे. यात समाधानकारक उत्तर दिले, तर सूट मिळू शकते. समाधान न झाल्यास संबंधितांची एक वेतनवाढ कायमची बंद केली जाणार आहे.
- जयश्री राऊत, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)