मेळघाटात रोहयो कामात बनावट मजूर, अंगठ्याने देयके काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:28 PM2018-02-20T23:28:17+5:302018-02-20T23:28:39+5:30
मेळघाटातील धूळघाट रेल्वे येथील रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट मजूर आणि अंगठ्याने देयके काढण्यात आल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (रोहयो) कडे सादर केला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : मेळघाटातील धूळघाट रेल्वे येथील रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट मजूर आणि अंगठ्याने देयके काढण्यात आल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (रोहयो) कडे सादर केला आहे. याप्रकरणी दोषी वनक्षेत्राधिकारी, वनरक्षकावर कठोर कारवाई होईल, असे संकेत आहेत.
रोहयो उपायुक्तांकडे एस.के. तायडे यांनी २७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार धूळघाट रेल्वे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि वनरक्षक सविता बेठेकर यांनी रोहयोच्या कामात गैरप्रकार केल्याचे म्हटले होते. त्यानुसार रोहयो उपायुक्तांनी १ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत झालेल्या कामांचे रेकॉर्ड तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित केली होती. यात रोहयोचे कार्यकारी अभियंता ए.एच. खान, लेखाधिकारी एस.एस. सुपासे, सहायक लेखाधिकारीे आर.जी. रायकवार यांचा समावेश होता. या समितीने २७ ते २९ डिसेंबर २०१७ दरम्यान धारणी येथे मोका चौकशी केली. चौकशीदरम्यान २४ मुद्द्यांसंदर्भात कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. विशेषत: हजेरी पत्रकावर ग्रामरोजगार व वनरक्षकांची स्वाक्षरी न घेता आरएफओंनी हजेरी पत्रक स्वत:च्या स्वाक्षरीने १४ हजार ५७२ रुपये काढल्याचे समितीच्या निदर्शनास आले. आरएफओ, वनरक्षकांन स्वत:च्या स्वाक्षरीने मजुरांचे हजेरीपत्रक भरल्याची बाब समोर आली आहे. धारणी तालुक्यातील पळसाकुंडी येथे होळी सणाच्या काळात मजूर कामावर गेले नसताना बनावट स्वाक्षरीने देयके काढण्यात आली आहेत. हजेरीपत्रकावर बनावट मजूर दाखवून रोहयोची कामात छेद लावण्याचा प्रताप आरएफओ दीपाली चव्हाण, वनरक्षक सविता बेठेकर यांनी केल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. वनाधिकाºयांनी रोहयोची कामात बनवाट मजूर आणि खोट्या स्वाक्षरीने तहसीलदारांकडे हजेरीपत्रक प्रदान केली आहेत. त्रिसदस्यीय चौकशी समितीने विभागीय आयुक्त कार्यालयाचे रोहयो उपायुक्तांकडे ९ जानेवारी २०१८ रोजी वस्तुनिष्ठ अहवाल पुढील कारवाईकरिता सादर केला आहे. आता याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे वनविभागातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
७४ वर्षीय महिला दर्शविली मजूर
हजेरीपत्रक क्रमांक १९०६२ नुसार जीजाबाई गायकवाड या ७४ वर्षाच्या आहेत. त्यांनी धारणी तहसीलदारांसमक्ष बयाण नोंदविले. आपण कोणत्याही कामावर गेले नाहीत. तरीसुद्धा रोहयो हजेरीपत्रकावर नाव नमूद आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांचे नावे बनावट देयके काढल्याचे ही बाब चौकशी समितीने समोर आणली आहे.
अपघातात जखमी महिलेचीही काढली देयके
हजेरीपत्रक क्रमांक १९०६३ नुसार मीराबाई गावंडे यांचा एका अपघातात पायाला दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला. त्या अलीकडे काठीचा आधार घेऊन कसेबसे चालतात. रोहयोच्या मजूर नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे तहसीलदारांकडे लिहून दिले आहे. त्यांच्या नावे हजेरीपत्रक भरून पैसे काढल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे.