कुटुंब रुग्णालयात, चोरटे शिरले घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:10+5:302021-07-20T04:11:10+5:30
वरूड/लोणी : मुलाच्या उपचाराकरिता वरूडला गेलेल्या कुटुंबाचे लोणी येथील घर चोरट्यांनी फोडून दागिने व रोकड असा अडीच लाखांचा ऐवज ...
वरूड/लोणी : मुलाच्या उपचाराकरिता वरूडला गेलेल्या कुटुंबाचे लोणी येथील घर चोरट्यांनी फोडून दागिने व रोकड असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. १८ जुलैला पहाटे ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनुसार, लोणी येथील प्रफुल्ल तिखे यांचा मुलगा दीपांशु (१४) याची प्रकृती बिघडल्याने त्याला घेऊन १५ जुलैला ते पत्नीसह वरूडला आले. रुग्णालयात त्यांना तीन-चार दिवस मुक्काम करावा लागला. १७ जुलैला दुपारी ते गावाला परतले व कुलूप लावून वरूडला निघून गेले. रविवारी सकाळी मुलासह कुटुंब परतले तेव्हा मुख्य प्रवेशद्वाराला असलेल्या लोखंडी गेटचे कुलूप तोडलेले आढळून आले. घरातील दोन आलमाऱ्या फुटल्या होत्या. कपडे आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. दोन्ही आलमाऱ्यांमधील ३० ग्रॅमचा सोन्याचा ९० हजारांचा पुष्पहार, १० ग्रॅमच्या ३० हजार रुपयत्च्या बिऱ्या, १० ग्राम ३० हजार रुपयांची अंगठी, ३ ग्रॅमचे ९ हजार रुपये किमतीचे रिंग, २१ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० ग्रॅमचे चांदीचे कारंडे, चांदीचे जोडवे, चांदीचे शिक्के, मनगट्या , तोरड्या तसेच एका आलमारीतून ६० हजार रुपये रोख आणि लाकडी आलमारीतून १५ हजार रुपये असे एकूण २ लाख ६५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद भूमिका प्रफुल तिखे (३९, रा . लोणी) यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपस सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनात बेनोडा पोलीस करीत आहेत.