कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, महिला ‘व्हेंटिलेटर’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:24 PM2017-12-01T23:24:53+5:302017-12-01T23:25:36+5:30
कुटुंब नियोजन शिबिरात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर एका महिलेची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचारासाठी नागपूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमोल ढवसे/संजय जेवडे ।
आॅनलाईन लोकमत
नांदगाव खंडेश्वर : कुटुंब नियोजन शिबिरात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर एका महिलेची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचारासाठी नागपूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर महिला तेथे तब्बल पंधरा दिवसांपासून अतिदक्षता विभागात आहे. विशेष म्हणजे, तिच्या प्रकृतीवर निरगणीसाठी तालुक्यातील दोन आरोग्य कर्मचारी दररोज हजेरी लावत आहेत. प्रकरण अंगलट येण्याची भीती असल्याने आरोग्य यंत्रणेद्वारा याविषयी कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ नोव्हेंबरला महिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित होते. यामध्ये १६ महिलांवर कुुटुंब नियोजन (टाक्याची) शस्त्रक्रिया करण्यात आली. यापैकी कांता भगत या महिलेची प्रकृती पाच दिवसानंतर अचानक गंभीर झाली. डॉक्टरांकडे तक्रार केल्यावर, औषधोपचार झाल्याचे उत्तर मिळाले. मात्र, उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने कांता भगत यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याची तक्रार नातलगांनी ना. डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. त्यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिल्यानंतर महिलेला १३ नोव्हेंबरला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. पंधरा दिवसांपासून ही महिला तेथील वार्ड क्र. २९ मध्ये अतिदक्षता विभागात आहे. कुटुंब नियोजनासारख्या साध्या व सोप्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने भगत कुटुंब कमालीच्या चिंतेत आहे.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश अस्वले यांच्यासह नांदगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबराव इंगळे, पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनकर मुरादे व या महिलेवर शस्त्रक्रिया करणाºया भातकुली तालुका वैद्यकीय अधिकारी वैशाली पाटील आदी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नियमित भेटी देत असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
एक लिटर पू काढला
रुग्णाला प्रकृती खालवत असल्याने अमरावती येथे दाखल करण्यात आले. येथून नागपूर रेफर करण्यामागे काय कारण आहे, या प्रश्नावर नातलगांना गोलगोल उत्तर देण्यात आली. नागपूर येथे उपचारादरम्यान पुन्हा शस्त्रक्रिया करून तब्बल एक लीटर पू काढल्याची माहिती महिलेच्या पतीने ‘लोकमत’ला दिली.
तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांची दररोज ड्युटी
प्रकरण शेकणार असल्याने नांदगाव तालुक्यासह जिल्हा आरोग्य यंत्रणाद्वारा आता सारवासारव केली जात आहे. नागपूर येथे दाखल महिला रुग्णावर लक्ष ठेवण्यासाठी तालुक्यातील दोन वैद्यकीय कर्मचाºयांची दररोज आळीपाळीने ड्यूटीच लावण्यात आली आहे. शुक्रवारीदेखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनकर मुरादे व तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबराव इंगळे नागपुरात तळ ठोकून आहेत. याविषयी आरोग्य यंत्रणा कमालीची गुप्तता पाळत आहे.
कांतावर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाच दिवसांनी तिची प्रकृती ढासळली. नेमके काय झाले, हे आता सांगता येणार नाही. याच शिबिरात अन्य रुग्णांवरही शस्त्रक्रिया झाली. त्यांची प्रकृती उत्तम आहे.
- वैशाली पाटील
शल्यचिकित्सक
कांता भगत या रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. मी स्वत: दोन वेळा नागपूरला भेटी दिल्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जखमेतील पू काढला. संसर्ग झाल्याची शक्यता आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू उपचार करीत आहेत.
- सुरेश असोले
जिल्हा वैद्यकीय अधिकारी
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर पत्नीची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टर काहीही सांगत नाहीत. शस्त्रक्रिया चुकली असावी. नागपूरला पुन्हा शस्त्रक्रिया करून एक लिटर पू काढला. धोकादायक स्थिती टळल्यानंतर याची तक्रार करू.
- अरविंद भगत,
पती