तळेगावातील सुप्रसिद्ध शंकरपट होणार सुरू; बैलगाडा धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 01:35 PM2021-12-19T13:35:13+5:302021-12-19T13:50:41+5:30
बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन बंदी उठवल्याने १५ जानेवारीला शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नीलेश रामगावकर
अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे 'पटाचे तळेगाव' म्हणून पश्चिम विदर्भात ओळखले जाते. विदर्भात तळेगाव नावाची अनेक गावे आहेत. तरीही तळेगाव म्हटले की, पटाचे तळेगाव हे नाव प्रकर्षाने पुढे येते. त्याची ओळख पुसली जाते की काय, असे वाटत असताना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्शत परवानगी दिली व निर्णय घटनापीठाकडे सोपविला. या निर्णयामुळे गावात जल्लोष व्यक्त होत आहे.
शेतातील कामे हातावेगळी झाली की, मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून येथे शंकरपट जात होता. शंकरपट म्हणजे बैलजोड्यांची शर्यंत. परंतु, गेल्या सात वर्षांपासून शंकरपटावर घातलेल्या बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील सशर्त परवानगी देऊन बंदी उठवल्याने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला तळेगाव येथील १५० वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयाने परवानगी देत बंदी उठवली. या निर्णयामुळे तळेगावात आनंद व्यक्त होत आहे.
तळेगाव दशासर येथील हा पट शेतकऱ्यांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी एक उत्सवच असतो. हा शंकरपट पाहण्याकरिता पंचक्रोशीतून लोक येत असतात. त्यामुळे येथील व्यवसायाला चालना मिळते, या शंकरपटात सुसाट वेगाने पळणारी रिंगी वजनाने अत्यंत हलकी असते. शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावर दोन खांब असतात. व त्याला धागा बांधलेला असतो, पहिला धागा तोडला की, घड्याळ सुरू होते व दुसरा धागा तोडला की घड्याळ बंद पडते. त्या दोन धाग्यांमधून धावतानाच्या नेमक्या वेगाची या घड्याळात नोंद होते. जी जोडी कमी वेळात अंतर कापेल, ती जोडी विजयी ठरते, या शंकरपटासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणून बैलजोड्या या स्पर्धेत खेळविल्या जातात आपल्या कोठ्यात दावणीच्या सर्जा-राजावर जिवापाड जपणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरशः वेडा होतो.
सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठवल्याने या निर्णयाचे स्वागतच आहे. शंकरपट हा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे उत्सव आहे. शंकरपट पूर्ववत सुरू होण्याने गावातील जनतेला आर्थिक चालना मिळेल.
- भरत लोया, प्रगतिशील शेतकरी, तळेगाव दशासर