शेतातील केबल वायर चोर जेरबंद, तिघांना अटक; वाहनासह ४.२३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By प्रदीप भाकरे | Published: October 8, 2023 02:32 PM2023-10-08T14:32:40+5:302023-10-08T14:32:51+5:30
अन्य गुन्ह्यांची देखील कबुली, जिल्हयात मागील काही दिवसात शेतातील केबल वायर, मोटर पंप, स्प्रिंकलर व शेती संबधीचे साहित्य चोरीच्या घटना वाढल्या
अमरावती: शेतातील केबल वायर चोरणाऱ्या एका त्रिकुटाला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह एकुण ४.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मेहफुज बेग मेहमुद बेग (३१), असलम शाह करीम शाह (३२) व आमीन शाह हयाद शाह (२४, तिघेही रा. अचलपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर अन्य एक आरोपी फरार आहे.
जिल्हयात मागील काही दिवसात शेतातील केबल वायर, मोटर पंप, स्प्रिंकलर व शेती संबधीचे साहित्य चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी ते गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार हे पथकासह ग्रामीण भागात केबल वायर चोरणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेत होते. ७ ऑक्टोबर रोजी मेहफुज बेग याने परतवाडा येथे त्याच्या पांढ-या रंगाच्या चारचाकी वाहनात शेतातील चोरलेल्या केबलमधील तांबा तार लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने परतवाडा गाठून त्या वाहनाची झडती घेतली. त्यात अर्धवट जळालेला तांबा तार मिळून आला. मेहफुज बेग याला ताब्यात घेऊन त्याला विचारणा केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
अशी मिळाली कबुली
साथीदार असलम शाह व आमिन शाह व एका अन्य सहकाऱ्यांच्या सोबतीने आपण मागील काही काळात शिरजगाव, खरपी, पुर्णानगर, वडुरा, टोंगलापुर, माधान, पांढरी शेतशिवारमधील शेतातून केबल वायर चोरली. केबलला जाळुन त्यातील तांबा तार विकण्याच्या तयारीत असल्याची कबुली मेहफुज बेग याने दिली. त्यानुसार त्या दोघांना अटक करण्यात आली. त्या दोघांनी देखील कबुली दिली.
सात गुन्हे उघड
आरोपींनी दिलेल्या कबुलीवरुन शिरजगाव (कसबा), चांदुरबाजार व आसेगाव पुर्णा पोलीस ठाण्यात नोंद एकुण सात गुन्हे उघडकिस आले. आरोपींना शिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किरण वानख यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाटे, शांताराम सोनोने, चालक संजय गेठे यांनी ही कार्यवाही केली.