बोअरवेल खणू न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 08:31 PM2020-03-21T20:31:50+5:302020-03-21T20:37:14+5:30
गुन्हे दाखल केल्यानंतर शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
अमरावती: खोडगाव शिवारात असलेल्या स्वमालकीच्या शेतीत बोअरवेल करण्यास मज्जाव करण्यात आल्याने एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा घेण्यात आला. सरतेशेवटी पाच जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. संतोष कपले (३५, पानअटाई, गुलजारपुरा, अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी मृताची पत्नी नीता संतोष कपले यांच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शनिवारी सुभाष थोरात, रतन थोरात, रवन थोरात, शुभम थोरात व महादेव भावे (सर्व रा. अंजनगाव सुर्जी) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कपले यांची खोडगाव शिवारात दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेजारच्या शेताचा ताबा सुभाष व रतन थोरात या भावांकडे आहे. कपले यांना ओलितासाठी बोअर खणायची होती. मात्र, आपल्या शेतातील पाणी कमी होईल, असे कारण सांगत थोरात यांनी विरोध केला.
तक्रारीनुसार, आठ दिवसांपूर्वी आरोपींनी संतोष व नीता कपले यांना शिवीगाळ व मारहाण केली. तो अपमान सहन न झाल्याने संतोष कपले यांनी १९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास विष प्राशन केले. त्यांना तातडीने अंजनगाव, अचलपूर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, २० मार्च रोजी रात्री ८.३० च्या सुमारास संतोष कपले यांचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेथेच शवविच्छेदन झाल्यानंतर तो मृतदेह शनिवारी दुपारी थेट अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात आणण्यात आला. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करून अंत्यसंस्कारास नकार देण्यात आला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेरीस मृताची पत्नी नीता कपले यांची जबानी नोंदवून पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी संतोष कपले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.