दर ३२ तासांत एक शेतकरी आत्महत्या : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २९ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 07:11 PM2020-01-02T19:11:09+5:302020-01-02T19:11:24+5:30

नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे.

A farmer commits suicide every 32 hours | दर ३२ तासांत एक शेतकरी आत्महत्या : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २९ प्रकरणे

दर ३२ तासांत एक शेतकरी आत्महत्या : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २९ प्रकरणे

googlenewsNext

अमरावती : नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे. यातून सावरण्यासाठी झालेले शासनप्रयत्न निष्फळ ठरल्याने जिल्ह्यात दर बत्तीस तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. वर्षभरात २६० शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सलग पाच वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली केली. मात्र, अटी व शर्तीमध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी राहिलेत. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यंदादेखील खरिपाच्या दोन महिन्यांत पावसात खंड पडल्यामुळे मूग व उडीद बाद झाले. त्यानंतर सोयाबीनच्या हंगामात १० दिवस अवकाळी पावसाने ‘कॅश क्रॉप’ची दैना केली. कपाशीचेही नुकसान झाले. एकूण ८० टक्के हंगाम बाधित झाला. त्यातुलनेत शासन मदत अल्प आहे. त्यामुळे खासगी सावकारांचे कर्जदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने कर्जाच्या तगाद्यामुळेही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे.

 शेतकरी आत्महत्यांची नोंद १ जानेवारी २००१ पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाते. त्यानुसार आतापर्यंत ३ हजार ८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १६९९ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरलीत. २०४६ अपात्र, तर अद्यापही ७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर प्रशासन संवेदनशील नाही. त्यामुळेच तब्बल तीन महिन्यांपासूनच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अद्यापही शासन मदत मिळू शकली नाही, हीदेखील तितकीच धक्कादायक बाब आहे.

सन २००१ पासून ३८१७ शेतकरी आत्महत्या
जिल्ह्यात १९ वर्षांत ३८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६२ आत्महत्या या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात २८७, फेब्रुवारी ३०९, मार्च ३२८, एप्रिल २६५, मे ३२५, जून २९२, जुलै ३०७, सप्टेंबर ३६२, ऑक्टोबर ३३४ नोव्हेंबर ३२२ व डिसेंबर महिन्यात ३१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा २६० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. याध्ये जानेवारी महिन्यात २०, फेब्रुवारी १९, मार्च २४, एप्रिल १७, मे २५, जून २०, जुलै २२, ऑगस्ट २९, सप्टेंबर २८, आॅक्टोबर १८, नोव्हेंबर २३ व डिसेंबर महिन्यात १९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.

Web Title: A farmer commits suicide every 32 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.