दर्यापूरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली इच्छामरणाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 10:59 PM2018-07-11T22:59:58+5:302018-07-11T23:00:10+5:30
कर्जमाफी न मिळाल्याने दर्यापूर तालुक्यातील साईनगर येथील एका शेतक-याने इच्छमरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे.
दर्यापूर (अमरावती) : कर्जमाफी न मिळाल्याने दर्यापूर तालुक्यातील साईनगर येथील एका शेतक-याने इच्छमरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. त्यांच्या कार्यालयाला पाठविलेल्या याच खलित्यात शेतक-याने आपली साडेचार एकर शेती शंभर रुपयांच्या मुद्रांकावर मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिली आहे.
साईनगर येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रमोद कुटे यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. ते स्वत: बी.एस्सी, तर पत्नी बी.कॉम. आहे. ते दरवर्षी काढलेल्या कर्जाची परतफेड करतात. २०१६ मध्ये त्यांच्यावर बँकेचे ७१ हजार कर्ज होते. नातेवाइकांकडून उसनवार व पत्नीचे दागिने अकोला येथे विकून त्यांनी कर्जाचा भरणा केला. २०१७ मध्ये त्यांनी ८१ हजार रुपये कर्ज काढले. परंतु ते रेग्युलर कर्ज भरत असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
सरकारने नियमित कर्जदारांना २५ हजारांची भीक न देता, कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी प्रमोद कुटे यांनी आतापर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यहार केला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे उद्विग्न स्थितीत आपल्या हातून काही विपरीत घडू शकते, या शंकेने त्यांनी १०० रुपयांच्या मुद्रांकावर मुख्यमंत्र्याच्या नावे शेती लिहून दिली. मुख्यमंत्र्यांनी आपली शेती विकून बँकेचे कर्ज वसूल करावे आणि उरलेले पैसे पत्नीच्या सांगण्यानुसार थकबाकीदारांना घ्यावे. उर्वरित पैसे इतर कर्जबाजारी शेतक-यांच्या खात्यात जमा करावे आणि पत्नीला किमान स्वच्छता विभागात कंत्राटी नोकरी द्यावी, अशी नोंद त्यांनी मुद्रांकावर केली आहे.
मी अल्पभूधारक शेतकरी आहे. गतवर्षी नापिकी झाल्याने मी बँकेचे कर्ज भरू शकलो नाही. २०१६ मध्ये पत्नीचे सोने विकून कर्ज भरले. मात्र, सरकारने कर्ज माफ केले नाही. माझ्या ७५ टक्के गुण पटकाविणा-या मुलीला उच्चशिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे मला इच्छमरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांनी द्यावी.
- प्रमोद कुटे, शेतकरी, साईनगर (दर्यापूर)