फक्कलच्या नाल्याला पूर उतरण्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:11+5:302021-09-27T04:13:11+5:30
पान २ लीड फोटो - हनवतखेडा २६ पी अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा गावालगतच्या फक्कल नाल्याला पूर ...
पान २ लीड
फोटो - हनवतखेडा २६ पी
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा गावालगतच्या फक्कल नाल्याला पूर आल्याने विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. पुरामुळे नादुरुस्त पुलावरील मार्ग बंद पडला होता. विषबाधा झालेल्या शेतकऱ्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याकरिता तब्बल तीन तास गावकऱ्यांना नाल्याला आलेला पूर उतरण्याची प्रतीक्षा करावी लागली.
पाणी कमी न झाल्यामुळे दुसऱ्या मार्गे वडगावहून सुनील सरदार नामक शेतकऱ्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना २४ सप्टेंबरला विषबाधा झाली. त्यांना लगेच उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावयाचे होते. पण, क्षतिग्रस्त पुलामुळे आणि नाल्याला आलेल्या पुरामुळे त्याला वेळेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करता आले नाही. तब्बल तीन तासानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारादरम्यान तासाभरात त्यांची प्राणज्योत मालवली.
हनवतखेडा पोचमार्गावरील फक्कलच्या नाल्यावरील पूल १० वर्षांपासून क्षतिग्रस्त आहे. दोन्ही बाजू खचल्या आहेत. रोडची कडाही खचली आहे. नाल्याला पूर आला की, रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. या मार्गावरून हनवतखेडा, दर्याबाद, दत्तझिरी, निमदरी, देवगाव, बदनापूर या गावांमधून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. रस्त्यावरील अतिक्रमण व नादुरुस्त पुलामुळे नेहमी अपघात होतात. या अनुषंगाने ग्रामपंचायत हनवतखेडा, दर्याबाद ग्रामस्थांकडून प्रशासनाला वारंवार ठराव व निवेदने देण्यात आली. पण, सार्वजनिक बांधकाम विभागासह बांधकाम प्रशासनाने याची अजूनही दखल घेतलेली नाही. आता शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तरी प्रशासनाला जाग यावी, अशी संतप्त भावना या मार्गाने ये-जा करणारे नागरिक व्यक्त करीत आहेत.
कोट
नादुरुस्त पूल व नाल्याला आलेल्या पुरामुळे, रुग्णाला, उपजिल्हा रुग्णालयात वेळेत पोहोचविता आले नाही. रुग्णालयात पोहोचायला वेळ झाल्यामुळे सुनील सरदार यांची प्राणज्योत मालवली. प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन योग्य उंचीचा पूल निर्माण करून द्यावा. तसे न झाल्यास ऑक्टोबरमध्ये ग्रामस्थ उपोषणाला प्रारंभ करतील.
- विजय ढेपे, सरपंच, हनवतखेडा