मेळघाटात वीज कोसळून शेतमालक- मजुराचा मृत्यू, सात जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:21 AM2023-07-20T11:21:01+5:302023-07-20T11:22:54+5:30
झाडाखाली आश्रय घेणे ठरले जोखमीचे, मोरगड येथील घटना
चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील मोरगड येथे बुधवारी दुपारी दाेन वाजता शेतात निंदण थांबवून मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी झाडाखाली आश्रय घेतला, तर काही प्लास्टिकची पन्नी अंगावर घेऊन शेतात उभे राहिले. ते उभे असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने एकाचा घटनास्थळी, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचा १८ वर्षीय मुलगा व मजुराचा समावेश आहे. गंभीर जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उर्वरित सात मजुरांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सुनील मोती भासकर (३५) व नीलेश बजरंग भासकर (१८) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी ललिता राजाराम जांभेकर (२२) या मजूर महिलेला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पार्वती राजाराम भासकर (४०), आरती सोमेश जांबेकर (२२), ओमपती लक्ष्मण मेटकर (६०), सविता गुरू धांडेकर (२४), जानकी किशोर काळे (३३), मीना बजरंग भासकर (४०), बजरंग मोती भासकर (४५, सर्व रा. मोरगड) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना नजीकच्या टेम्ब्रूसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. चंदन पिंपरकर यांनी प्रथमोपचार करून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविले.
जेवण्याच्या बेतात असताना अनर्थ
मोरगड येथील बजरंग भासकर यांच्या शेतात निंदणासाठी गेलेले मजूर दुपारी दाेन वाजता जेवणासाठी विराम घेणार होते. तेवढ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजा कडाडत असताना काही जण शेतातच अंगावर प्लास्टिक पन्नी घेऊन उभे राहिले, तर काही झाडाखाली आश्रय म्हणून धावत गेले. तेथे त्यांच्यावर वीज कोसळली. दगावलेले सुनील व नीलेश हे काका-पुतणे आहेत.
मदतीची मागणी
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी तत्काळ संबंधित अधिकारी व रुग्णालयाशी संपर्क साधून डॉक्टरांना उपचाराबाबत निर्देश दिले. मुख्यमंत्री निधीतून मृताचे वारस व जखमींना मदत देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मोरगड येथे शेतात काम करीत असताना वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. महिला गंभीर असून सात जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पंचनामा तलाठी करीत आहेत. वरिष्ठांना माहिती कळविली आहे.
- गजानन राजगडे, प्र. तहसीलदार, चिखलदरा