शेतकऱ्याच्या लेकाच्या लग्नाला व-हाडी निघाले बैलगाडीतून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 08:10 PM2018-05-02T20:10:54+5:302018-05-02T20:10:54+5:30
धामणगाव रेल्वे तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतक-याने ती जपत आपल्याकडील व-हाड बैलगाडीतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले.
- मोहन राऊत
अमरावती - धामणगाव रेल्वे तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतक-याने ती जपत आपल्याकडील व-हाड बैलगाडीतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले.
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील हाडाचे शेतकरी असलेले हरिभाऊ इंगोले यांचा मोठा मुलगा रूपेश यांचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथील नानाजी वानखडे यांच्या उच्चशिक्षित शीतल या मुलीशी बुधवारी नायगाव येथे लखाजी महाराज देवस्थान सभागृहात पार पडला. घरी सर्व संपन्नता असतानाही शेतक-याचा मुलगा असल्याने गावातील बैलबंडीने व-हाडी लग्नमंडपी नेण्याचे त्याने ठरविले. नवरदेवासह व-हाडी विवाह सोहळ्यासाठी बैलगाडीने निघाल्याने या विषयाची तालुक्यात चर्चा रंगत आहे. जवळपास १५ बैलगाड्यांनी व-हाडी निघाले, तर नवरदेवाकरिता सजविलेली दमणी होती. मंगरूळ दस्तगिर ते नायगाव असा प्रवास करून लग्नकार्य उरकल्यानंतर नवरदेव-नवरी पुन्हा त्याच बैलगाड्यांने घरी परतले.
शेतक-यांचा मुलगा असल्याने आपल्या परंपरेचे जतन व्हावे, जुन्या आठवणी कायम राहाव्या कायम राहाव्या, यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविला.
- रूपेश इंगोले, नवरदेव