कर्जाच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या, अवकाळीने झाले होते नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 06:47 PM2019-12-09T18:47:04+5:302019-12-09T18:47:50+5:30
पंजाब पवार यांच्याकडे वडिलोपार्जित ३० गुंठे शेती होती. त्यांनी यंदा शेतात कपाशीची लागवण केली होती
अमरावती : भातकुली तालुक्यातील हरताळा येथील एका 65 वर्षीय शेतकऱ्याने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. पंजाबराव रामकृष्ण पवार असे मृताचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेत भातकुली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पंजाब पवार यांच्याकडे वडिलोपार्जित ३० गुंठे शेती होती. त्यांनी यंदा शेतात कपाशीची लागवण केली होती. मात्र, पाऊस अधिक झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागले. पायाची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्याकडून फारसे काम होत नव्हते. त्यातच आर्थिक स्थिती डबघाईस आली, शिवाय ते आजारी राहत होते. शेतीसाठी त्यांनी खासगी क्षेत्रातून कर्ज घेतले होते. या मानसिक तणावातून पंजाब पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. पंजाब पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली व एक मुलगा आहे. घटनेची तक्रार रोशन गंगाधर पवार यांनी भातकुली पोलिसांत नोंदविली. त्यामध्ये पंजाब पवार शेतातून घरी परत आल्यानंतर त्यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे काकूने सांगितल्याचे नमूद केले आहे. भातकुलीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वानखडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक तपासानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली.